आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १0 : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन बळीराजा सनद‘ स्वरुपात शनिवारी प्रभारी निवास उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांना देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. तरीही केंद्र व राज्य सरकार याकडे गांभिर्याने पाहात नाहीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय त्याला नव्या हंगामासाठी शेती करणे अशक्य आहे. निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाचे पडलेले भाव, सततचा अवकाळी पाऊस गारपिटीमुळे होणारे नुकसान भरुन काढणे अवघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून बळीराजाची अवस्था गंभीर झाली आहे. यासाठी ‘बळीराजाची सनद’ स्वरुपात मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे.
स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करुन किफायतशीर व सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा, बि-बियाणे, खते व औषधांचा पुरवठा शासनामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर उपलब्ध करुन द्यावे. अल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान तीन लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट शून्य व्याजदराने द्यावे, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, किसन चौगुले, पंडितराव केणे, मुकुंद देसाई, बी.एन.पाटील-मुगळीकर, संगीता खाडे आदींचा समावेश होता.
स्वाभिमानी सप्ताह सुरु
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयात प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडुन आलेली बळीराजाची सनद जिल्हाध्यक्ष मा ए वाय पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केले. त्यानंतर बिंदू चौक येथील छञपती शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आबेंडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वाभिमानी सप्ताहाची सुरवात करण्यात आली.