मुरगुडातील जांभूळखोरा परिसरातील सर पिराजीराव तलावाची असणारी चर सहा ठिकाणी फुटल्यामुळे शेकडो एकरांतील शेती, घरे, विहिरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त जांभूळखोरा वसाहतीच्या रस्ता व पाणीपुरवठ्यासाठी दोन कोटी रुपयांचे तत्काळ अनुदान मिळावे, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीकडे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी हे निवेदन मंत्री, आमदार, खासदार यांनाही दिले आहे. मुरगुडातील जांभूळखोरा परिसरातील सरपिराजी तलावाची असणारी चर सहा ठिकाणी फुटल्यामुळे याचा सर्वाधिक फटका जांभूळखोरा वसाहतीला बसला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. परंतु, नगरपालिकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर व्हावे या मागणीचे निवेदन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविल्याचे नगराध्यक्ष जमादार यांनी सांगितले.
मुरगूड जांभूळखोऱ्यासाठी दोन कोटींचे अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:24 AM