शिरोली : लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागणाऱ्या कलाकार व मालकांना आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अन्यथा राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात कुटुंबासह चुली मांडून मुक्काम करू, असा इशारा कलाकार महासंघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लाॅकडाऊनमुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकार सरकारला सहकार्य करत असतानाही सरकारकडून त्यांना कोणतीच मदत दिली जात नाही. या मदतीबाबत शासनदरबारी पाठपुरावा केला, निवेदने दिली, मोर्च काढले. परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे सरकारने कलाकारांना त्वरित मदत द्यावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कलाकारांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये द्यावेत, अन्यथा लवकरच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकार व मालक प्रत्येक तहसील कार्यालयात आपली मुलेबाळे घेऊन तेथेच संसार थाटतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष जयवंतराव वायदंडे, कार्याध्यक्ष राम कुंभार, शहराध्यक्षा शोभा पाटील, महेश कदम, उत्तम चौगुले, रवी साळवी, सागर साठे उपस्थित होते.
कोट :-
कलाकारांचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकार व मालक यांना मदत जाहीर करावी, अन्यथा पुढील मुक्काम महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयात करू.
- अनिल मोरे, संस्थापक - अध्यक्ष, कलाकार महासंघ
फोटो : ०८ कलाकार निवेदन
कलाकारांना मदत द्यावी, अशी मागणी कलाकार महासंघाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.