कोल्हापूर : कोरोना विषाणूवर अजून कोणतीही लस आली नाही, असे सारे जग म्हणते; परंतु आमचा दावा आहे की, तुम्ही होमिओपॅथीला एक संधी द्या. आम्ही कोरोनाचा रुग्ण नक्की बरा करून दाखवितो, असा दावा भारतातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विजयकुमार माने यांनी केला. आम्ही त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री व आयुष मंत्रालयाशी गेले दोन महिने वारंवार संपर्कात आहोत.
अनेक वेळा त्यांना रीतसर मेल पाठविले. आयुष मंत्रालय मेलही स्वीकारायला तयार नाही. त्यांनी ‘यासाठी आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली आहे, ती निर्णय घेईल,’ असे सांगितले. रुग्ण लाखाच्या घरात गेले, मृत्यूंची संख्या रोज वाढत आहे; परंतु या समितीचा काही निर्णय होत नसल्याचा अनुभव येत आहे. आम्ही गेल्या दोन महिन्यांत एक हजार लोकांना होमिओपॅथीची औषधे वापरली. त्यांतील कुणीही आजारी पडलेले नाही. त्यांची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. आमच्या दाव्याला संशोधनाचा, आमच्या २५ वर्षांच्या अनुभवाचा आधार आहे. तुम्ही त्यांची तपासणी करू शकता; पण कोरोनावर उपचार करण्याची संधी द्या, असा डॉ. माने यांचा आग्रह आहे.
प्रश्र्न : कोरोनावरील उपचाराची स्थिती सध्या कशी आहे?
डॉ. माने : कोरोना या आजाराबद्दल समाजात नको तेवढी भीती निर्माण केली जात आहे. आजपर्यंत आपल्याला कधीच पीपीई किटची माहिती नव्हती. ज्यावेळी सुरुवातीला रुग्ण कमी होते तेव्हा आम्ही १०० टक्के लॉकडाऊन केले आणि आता रुग्ण वाढू लागल्यावर लोक रस्त्यांवर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने हा साथीचा रोग असल्याचे जाहीर केले; परंतु ते चुकीचे आहे. हा साथीचा रोग असता तर जगभरातील रुग्णांची संख्या खूप वाढली असती. पण चित्र तसे नाही. या रोगाला आपण सामोरे जाऊया आणि चांगले उपचार करूया. त्याची अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही.
प्रश्न : होमिओपॅथीद्वारे उपचाराचा दावा आपण कशाच्या आधारे करता?
डॉ. माने : आमच्याकडे त्यासंबंधीचे काही पुरावे आहेत. हिपॅटिटस बी, एचआयव्ही आणि एचबीव्हीच्या रुग्णांनाही आम्ही उपचार करतो. एचआयव्हीच्या रुग्णांचा व्हायरल लोड आमच्या उपचारामुळे शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिपॅटिटस बी व एचबीव्हीमध्ये हा लोड तीन कोटी किंवा ३० कोटी असू शकतो; परंतु तुम्ही आजारी पडलेला नसाल तर त्याला भीती बाळगण्याची गरज नाही. कोरोनामध्येही तसेच आहे. या विषाणूवर कोणती लस शोधल्याचा आमचा दावा नाही; परंतु रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे आणि त्याच आधारावर आमचा या उपचारासाठी आग्रह आहे.
प्रश्न : कोरोनामुळे मृत्यू झाले हे कसे नाकारता येईल?
डॉ. माने : कोरोनामुळे मृत्यू झाले; परंतु त्याचा मृत्युदर तपासून पहा. तो आजार आता समजला जातो तेवढा गंभीर नाही. क्षयरोग, मलेरिया, एचआयव्हीपेक्षा त्याचा मृत्युदर कमी आहे. आजार कणभर असताना त्याचा प्रचार मणभर झाल्यामुळे लोकांत भीती पसरली. ही भीती पसरवण्यात सोशल माध्यमांचा वाटा मोठा आहे. कोविड हा एवढा मोठा आजार नाही आणि असेल तर त्याच्यावर उपचार करून त्याला सामोरे गेले पाहिजे आणि आमच्याकडे त्याच्यावरील उपचार उपलब्ध आहेत. त्यातून रुग्ण बरा होऊ शकतो, हे आम्ही जिल्हा प्रशासन व राज्य व केंद्र सरकारनाही सांगितले; परंतु ते दखलच घ्यायला तयार नाहीत. म्हणून आमचे सांगणे हेच आहे की, तुम्ही लोकांवर उपचार करा आणि त्यांना बरे करा. त्यासाठी लॉकडाऊनचीही गरज नाही. ते केल्यामुळे तुमची अर्थव्यवस्था कोलमडली. नवे प्रश्न तयार झाले.
कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे रुग्ण नव्हे
एखाद्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू आढळला तर तो कोरोनाचा रुग्ण नव्हे. त्याची प्रकृती उत्तम असेल तर त्याला तुम्ही आजारी का समजता? तो आजारी पडला तरच धोका आहे; अन्यथा घाबरण्याची गरज नाही. यामागे लस कंपन्यांचे अर्थकारणही कारणीभूत आहे. देशात आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झाला त्यांतील ७९ टक्के रुग्णांना काही ना काही इतर आजार होते. एका बाजूला तुम्ही कोरोनावर उपचार नाही म्हणता आणि मग कित्येक रुग्ण उपचारानंतर बरे होऊनही घरी गेले आहेत. आमचे म्हणणे तेच आहे, की त्यांच्यावर उपचार करूया आणि त्याची संधी होमिओपॅथीलाही द्या.
डॉ. विजयकुमार माने