कोपार्डे : स्वत:चे करिअर हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याने आधी करिअरला महत्त्व द्या, मगच शरीरसौष्ठवमध्ये यश मिळविण्यासाठी संघर्ष करा, असा सल्ला मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगले याने दिला. कोपार्डे (ता. करवीर) येथे आपल्या जन्मगावी कौटुंबिक कार्यक्रमासाठी तो आला होता. याप्रसंगी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना शरीरसौष्ठवमध्ये करिअर करणाऱ्या युवकांना त्याने सल्ला दिला. महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याचा पहिला बॉडी बिल्डर म्हणून आपण जागतिक व मानाची असणारी ‘मिस्टर युनिव्हर्स’ची स्पर्धा जिंकत अटकेपार मराठ्यांचा झेंडा फडकावला. मात्र, या यशाला गवसणी घालताना आपल्याला काय काय कष्ट करावे लागले, याचे विवेचन करताना अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. संग्राम म्हणाला, आपल्याला अतिशय सुसंस्कृत व उच्चविद्याविभूषित कुटुंब लाभले आहे. माझे आई-वडील शिक्षक आहेत, तर भाऊही चांगल्या नोकरीवर असून, एक बहीण न्यायाधीश आहे. आमच्या कुटुंबाला बॉडी बिल्डिंंगबाबत गंधही नाही. माझे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना माझ्या मित्राच्या बॉडी बिल्डिंंगच्या सल्ल्याने आपण इकडे वळलो. मात्र, यात यश मिळविण्यासाठी मला माझ्या गावाबरोबर जिल्हा सोडावा लागला. गेल्या १० ते १५ वर्षांपासून आपण तेल, मीठ व्यर्ज करून चमचमीत खाद्याचाही त्याग केला आहे. प्रतिदिन किमान पाच तास मी व्यायाम करतो. केवळ फॅशन म्हणून बॉडी बिल्डिंंगमध्ये न उतरता प्रथम आपले शिक्षणाद्वारे करिअर बनवा. तिसाव्या वर्षापासून आपण शरीरसौष्ठवमध्ये यश मिळवू शकतो. हे मी स्वत: कृतीद्वारे शक्य केले आहे. या खेळातील प्रस्थापितांना बाजूला करण्याची ताकद निर्माण करावयाची असेल, तर संयम व कष्ट करण्याची गरज आहे. आपल्या आयुष्यात आई-वडील व मला प्रोत्साहन देणाऱ्या गुरूंना आदराचे स्थान आहे. भारतातील दुसरा, तर महाराष्ट्राचाच काय कोल्हापूरचा पहिला ‘मिस्टर युनिव्हर्स’ या मानाच्या किताबाचा मराठा मानकरी ठरल्याचे अभिमानाने तो सांगतो.
प्रथम करिअरला महत्त्व द्या
By admin | Published: September 22, 2014 1:10 AM