कोल्हापूर : ऊस, केळी व द्राक्षासारख्या बहुवार्षिक पिकांची पीक कर्जे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीची असतात. हे शेतकरी सलग तीन आर्थिक वर्षाच्या कर्ज परत फेडीच्या निकषात बसत नाहीत. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यातील निकषामुळे बहुतांशी ऊस उत्पादक शेतकरी अपात्र ठरत आहेत. जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना या निकषाचा फटका बसणार असल्याने निकषात बदल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ९ ऑगस्टपूर्वी निर्णय घेण्यास सांगितले होते.शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजू शेट्टी यांची मुंबईत बैठक झाली. यामध्ये त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीसाठी पात्र असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिल्यास एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना भूमी अधिग्रहण कायद्यात बदल केला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यांतील एफ. आर.पी.चा निर्णय घेतला. हे निर्णय रद्द करा व राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांना थेट नाबार्डकडून ४ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यास केंद्र सरकारला राज्य सरकारकडून शिफारस करावी व शेतीपंपास दिवसा वीज देण्यात यावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, अनिल मादनाईक, डॉ. सोमेश्वर गोलगिरे आदी उपस्थित होते.
व्याज परताव्यास पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या, राजू शेट्टींची राज्य सरकारकडे मागणी
By राजाराम लोंढे | Published: July 16, 2022 5:21 PM