कोल्हापूर , दि. १८ : परतफेडीच्या मुदतीवरून ऊस उत्पादन पट्ट्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. कर्जमाफीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्या शेतकऱ्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल. कर्जमाफीत पात्र असलेला एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले असून आयुक्त कार्यालयाकडून त्याची छाननी होऊन त्या अंतिम मंजुरीसाठी तालुकास्तरीय कमिटीकडे पाठविल्या जाणार आहेत. या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील.
ऊस पट्ट्यातील परतफेडीचा कालावधी व कर्जमाफीचे निकष यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनामार्फत सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यावर उच्चस्तरीय कमिटी निर्णय घेणार आहे, शेतकऱ्याची अडचण सरकारच्या लक्षात आल्याने त्याही शेतकऱ्याना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
केंद्राच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटींचे पुनर्गठन व राज्य सरकारची कर्जमाफीचा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, हे कर्ज सन २००९ पूर्वी घेतल्याने अडचणी आहेत, पण त्याचे पुनर्गठन सन २०१२ झाल्याची नोंद सहकार विभागाने घेतली आहे, याबाबतही लवकर निर्णय होईल. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
सोमवारपासून पुन्हा चावडी वाचनमध्यंतरी झालेल्या चावडी वाचनात ५८७ हरकती आलेल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे होऊ न शकलेल्या चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवार (दि. २३) पासून उर्वरित गावांत वाचन केले जाणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
...त्यात कसली अब्रू जाते?चावडी वाचनाला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केल्याचे निदर्शनास आणल्यानंतर, खोत म्हणाले, कसली अपमानास्पद वागणूक, उलट त्यातून एखादा अपात्र ठरला असेल तर तो हरकत घेऊन पात्र ठरू शकतो. कर्ज घेतले, त्यातील काही थकले याचे वाचनाने अब्रू कसली जाते.