कागल : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत मराठा समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांच्या व्याज परताव्यामध्ये अनियमितता आहे. राज्य सरकार मराठा समाजाला दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाही असेच दिसत आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. यामध्ये लक्ष घालून दिलासा मिळवून द्या, असे साकडे मराठा समाजातील तरुणांनी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना घातले आहे.
यावेळी शिरोळ तालुक्यातील नीलेश पगडे म्हणाले राज्य शासनाकडून पूर्वी पंधरा दिवसांत मिळणारा व्याज परतावा आता दोन महिन्यांपासून मिळालेला नाही.
कोरोनाच्या नावाखाली या मुदतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. यापुढे नियमितपणे भरणे अडचणीचे होणार आहे. राज्य बँक असोसिएशनचे संचालक शिरीष कनेरकर, ओंकार अस्वले यांनी ही भावना व्यक्त केल्या. यावेळी जयसिंगराव माने, राजेंद्र जाधव, नगरसेवक विशाल पाटील, प्रताप पाटील यांच्यासह लाभार्थी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
समरजित घाटगे म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन मंडळामध्ये विलीनीकरण केले आहे. मात्र, कोणत्याही वेगळ्या निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे व्याज परताव्यात अनियमितता आली आहे. यामुळे मराठा तरुणांसह बँकाही अडचणीत येऊ शकतात. शासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा. एकत्र येऊन आवाज उठवावा. मी तुमच्यासोबत रस्त्यावर उतरण्यास तयार आहे.
छायाचित्र
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या लाभार्थी तरुणांनी व बँक पदाधिकाऱ्यांनी कागल येथे समरजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.