आळते : लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, मिरज रेल्वे स्थानकाला अन् लातूर विमानतळाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्यात यावे, आलमगिरी आळते (ता. हातकणंगले) येथील योगपीठाला शासनाने भरीव विकासनिधी द्यावा, लिंगायत समाजाला वीरशैव म्हणून दाखला न देता ‘लिंगायत’ म्हणूनच दाखला द्यावा, अशा विविध मागण्यांबरोबरच बसवेश्वरांचा विचार हा व्यक्ती, व्यासपीठापुरता मर्यादित न राहता तो तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. बसवेश्वरांच्या विचारांचा जागर, ध्वज कायम फडकवत ठेवा, असे प्रतिपादन जगद्गुरू माता महादेवी यांनी केले.आलमगिरी आळते (ता. हातकणंगले) येथील तीन दिवस सुरू असलेल्या लिंगायत गणमेळाव्याच्या सांगता सप्ताहात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख सरपंच जयश्री हांडे होत्या.सुरुवातीला सामूहिक प्राथनेनंतर ध्वजारोहण, गुरूपूजा, पीठारोहण, लिंगपूजा, असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सतीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माता महादेवी म्हणाल्या, लिंगायत धर्माची वैचारिक उंची इतर धर्मांपेक्षा मोठी आहे. मानवता धर्म प्रस्थापित करणारी आहे. बहुजन समाजाला कायमपणे परिवर्तनवादी विचार हे लिंगायत धर्माने सांगितले आहेत.यावेळी सुभाष साळगावकर म्हणाले, बसवेश्वरांचे विचार बरोबर असतील, तर माणूस कधी एकटा राहात नाही. या लिंगायत मेळाव्याच्या अनुषंगाने वैचारिक पीक काढा. यावेळी शोभा आवटी, आण्णासोा शहापुरे, शोभा शहापुरे, बी. एस. पाटील, रूपाली गाडवे, सुरेश इंगळे, प्रदीप वाली यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या
By admin | Published: March 24, 2015 9:04 PM