पुरुषसत्ताक पद्धतीची पाळेमुळे आपल्या जनमानसात इतक्या खोलवर रुजली आहेत की मुलीचे लग्न करून द्यायचे म्हटले की वडिलांना किमान ७-८ लाखांची तजवीज करावी लागते. मग मुलगी ग्रामीण भागातील असू दे नाही तर शहरातील, शिकलेली असो किंवा अशिक्षित. ही वरदक्षिणा घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी त्याचे अंतिम स्वरूप मात्र हुंड्याचेच असते. आपली मुलगी सुखवस्तू कुटुंबात नांदावी, अशी पालकांची इच्छा असते, मुलीलाही वेल सेटल्ड मुलगा हवा असतो, जितक्या जास्त अपेक्षा तितक्या प्रमाणात हुंडा असे हे समीकरण आहे. आम्ही आमच्या मुलीला २५ तोळे सोनं घातलं, लग्न थाटात करून दिलंय, त्या मानाने तुम्ही पण करा अशा समजावणीच्या सुरात हा हुंडा मागितला जातो.
---
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव
१ लग्न धुमधडाक्यात करून द्या, पाहुण्यांच्या मानसन्मानात कसूर होऊ नये
२ मुलासाठी दुचाकी-चारचाकीची मागणी
३ नोकरीसाठी पैशांची मागणी
---
मुलींचे माता-पिताही जबाबदार
आपली मुलगी सर्व सुखसोयी सुबत्ता असलेल्या घरात नाांदावी अशी पालकांची इच्छा असते. अशा घरातील मुलांच्या कुटुंबीयांची मागणीही तितकीच मोठी असते. गाडी, फ्लॅटसाठी पैसे द्या अशी मागणी सुरू होते. नाही तर मग आम्ही आमच्या मुलीला एवढं करून दिलंय तुम्ही काय करणार, अशी विचारणा सुरू होते. त्यामुळे मुलीसाठी स्थळ निवडताना पालकांनी या बाबींचा विचार करून पुढे पाऊल उचलले पाहिजे.
तनुजा शिपूरकर (महिला दक्षता समिती)
--
अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत
आता लग्नाच्या आधीच पैशाच्या रूपात हुंडा घेण्याचे प्रकार कमी झाले आहेत. मुलीला दागिने, मुलाला उंची कपडे, लग्न धुमधडाक्यात करून द्या, पुढे लग्न झाल्यावर मालमत्ता खरेदीसाठी पैसे द्या, अशी मागणी होत आहे. याला अशिक्षित आणि उच्चशिक्षित असा कुठलाही वर्ग अपवाद राहिलेला नाही. हुंडा घेतला जातोच फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असते इतकंच.
---
दाखल झालेले गुन्हे
२०२० : ३२२
२०२१ (जुलैपर्यंत) : ६२
---
माझे लग्न दोन दिवसांवर आहे. स्वत:चा व्यवसाय आहे. फार मोठी सुबत्ता नाही; पण आम्ही मुलीच्या कुटुंबीयांकडून कशाचीही मागणी केलेली नाही. तिने आहे त्या परिस्थितीत साथ देत सुखाने संसार करावा एवढीच अपेक्षा आहे. हुंडा घेणं आणि देणं हा प्रकार मला कधीच पटला नाही.
विशाल कदम (आर. के. नगर)
---
सध्याच्या काळात मुलींच्याच अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत की मुलांची लग्नं जुळणं हेच मोठे दिव्य आहे. सध्या अनेक जातींमध्ये विशेषत: कर्नाटक व सीमाभागात मुलीच्या कुटुंबीयांना हुंडा द्यावा लागताे अशी वेळ आली आहे. माझे जीवनमान, स्वभाव, कुटुंबाची संस्कृती यानुसार मुलगी मिळावी हीच अपेक्षा आहे. हुंड्याचा विषय तर सोडूनच द्या.
सौरभ जाधव (शिवाजी पेठ)
---