शिरोली : शासनाचा प्राधिकरणाचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. गेल्या वीस वर्षांपासून स्वतंत्र नगरपालिकेची मागणी असून, शासनाने स्वतंत्र नगरपालिकाच मंजूर करून द्यावी, अन्यथा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर शिरोलीकर बहिष्कार टाकतील, असा इशारा माजी पंचायत समितीचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते शशिकांत खवरे यांनी दिला. शिरोली ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.शिरोलीत प्रस्तावित प्राधिकरणबाबत हद्दवाढ विरोधी कृती समितीचे निमंत्रक नाथाजी पोवार यांचे पत्रक आले होते. हे पत्रक वाचल्यानंतर यामध्ये प्राधिकरण म्हणजेच हद्दवाढ आहे, अशी चर्चा झाली. यावेळी सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींची तत्काळ बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बोलावण्यात आली.यावेळी खवरे म्हणाले, प्राधिकरण म्हणजे एक प्रकारची हद्दवाढ आहे. प्राधिकरण आले की ग्रामपंचायतीला काहीच अधिकार राहणार नाहीत. फक्त नावाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असतील. सगळा प्रशासकीय कारभार प्राधिकरण पाहणार आहे. यामुळे ही एक प्रकारची जनतेचीही फसवणूक आहे. गावकऱ्यांची प्राधिकरणाची मागणी नसून, स्वतंत्र नगरपालिकेची मागणी आहे. मग शासन आमच्यावर प्राधिकरणाची मेहरबानी का करत आहे. प्राधिकरण आणि महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी. शासनाने आम्हाला स्वतंत्र नगरपालिका मंजूर करून द्यावी अन्यथा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर शिरोलीकर बहिष्कार टाकतील, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन यावेळी लढाईत शिवसेना आघाडीवर असेल, असे महेश चव्हाण यांनी सांगितले. नगरपालिकेची मागणी असताना प्राधिकरण कशासाठी थोपले जात आहे. प्राधिकरण म्हणजे पाठीमागील दरवाजाने हद्दवाढच, प्राधिकरण झाल्यावर पुढील पाच वर्षांत हद्दवाढ होणारच, असे ज्योतिराम पोर्लेकर म्हणाले.प्राधिकरणाच्या माध्यमातून अठरा गावांच्या लोकांची नाथाजी पोवार दिशाभूल करीत आहेत. पोवार आणि राजू माने यांनी प्राधिकरणाबाबत एक पत्रक काढले आहे. हे पत्रक सर्व ग्रामपंचायतीत दिले आहे. या पत्रकातील मजकूर त्यांचा स्वत:चा आहे. याबाबत अठरा गावांतील लोकांशी कोणतीही चर्चा केलेली नसल्याचे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख सतीश रेडेकर यांनी सांगितले.माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी माजी सरपंच विठ्ठल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांनीही प्राधिकरणाला विरोध दर्शविला. यावेळी उपसरपंच गोविंद घाटगे, सलीम महात, लियाकत गोलंदाज, शिवाजी खवरे, विजय जाधव, उत्तम पाटील, शिवाजी कोरवी, संदीप तानवडे, सचिन गायकवाड, योगेश खवरे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर) नव्या लढ्यास : शिरोलीकर पुन्हा सज्जकोल्हापूरच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात सर्वांत प्रथम शिरोलीकर उतरले. अठरा गावांच्या आंदोलनात शिरोलीकर आघाडीवर आणि आक्रमक होते. शिरोलीसाठी नगरपालिका व्हावी यासाठी देखील ग्रामस्थांचा लढा सुरू आहे. हद्दवाढीचा नियोजन बारगळल्यानंतर आता नगरपालिका मंजुरीसाठी निर्णायक लढा उभारण्याचा आणि त्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत सर्व वक्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नगरपालिका द्या, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार
By admin | Published: September 27, 2016 12:38 AM