कोल्हापूर : हयातीच्या दाखल्यांचे अद्ययावतीकरण रेंगाळल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सेवानिवृत्ती वेतनधारकांना एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडची पेन्शन (ईपीएफ निवृत्ती वेतन) मिळालेली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दाखले देऊनही पेन्शन मिळाली नसल्याने सुमारे साडेतीनशे सेवानिवृत्त वेतनधारक वैतागले आहेत. हक्काचे पैसे असल्याने आम्हाला निवृत्तिवेतन वेळेत मिळावे, अशी मागणी ‘लोकमत हेल्पलाईन’च्या माध्यमातून भारतीय स्टेट बँकेच्या टिंबर मार्केट शाखेतील काही पेन्शनधारकांनी केली आहे.केंद्र सरकारने ११ नोव्हेंबर १९९५ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड योजना सुरू केली. या संबंधित कर्मचारी आणि त्याच्या कंपनीने भरलेल्या प्रॉव्हिडंट फंडापैकी काही रक्कम शिल्लक ठेवून त्याच्या व्याजातून या कर्मचाऱ्यांना पेन्शन देणे सुरू केले. या योजनेतील स्टेट बँकेच्या टिंबर मार्केट शाखेत ३८८ पेन्शनधारक आहेत. त्यांच्याकडून ३ नोव्हेंबर २०१४ रोजी हयातीचे दाखले बँकेने घेतले. बँकेने ३ डिसेंबरला संबंधित दाखले भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पाठवून दिले. पण, या कार्यालयाकडून दाखल्यांचे अद्ययावतीकरण वेळेत झाले नसल्याने पेन्शन थांबविण्यात आली. त्याबाबत पेन्शनधारकांनी बँकेकडे चौकशी केली असता. त्यांना दाखले भविष्य निर्वाहकडे पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. स्टेट बँकेतील पेन्शनधारकांप्रमाणे जिल्ह्यातील अन्य काही बँकांमधील देखील पेन्शनधारकांची अवस्था आहे. बँकेने दिलेल्या मुदतीत दाखले जमा करून देखील गेल्या चार महिन्यांपासून पेन्शन रखडल्याने पेन्शनधारक वैतागले आहेत. भलेही प्रत्येक पेन्शनधारकाची त्याला दरमहा मिळणारी पेन्शनची रक्कम कमी असो, पण ती वेळेत मिळणे त्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे बँक आणि ‘पीएफ’ कार्यालयाच्या प्रशासनाने समन्वय साधून लवकरात लवकर गेल्या चार महिन्यांपासून थकीत असलेली पेन्शन खात्यावर जमा करावी, अशी मागणी पेन्शनधारकांनी केली आहे. (प्रतिनिधी)दोनवेळा दाखले पाठविले...पेन्शनधारकांचे हयातीचे दाखले ३ डिसेंबर २०१४ नंतर पुन्हा एकदा १० मार्चला ‘पीएफ’ कार्यालयाकडे पाठविले आहेत. त्यांच्याकडून दाखले अद्ययावतकरणाचे काम प्रलंबित राहिल्याने पेन्शन थकीत राहिली आहे. त्याबाबत आमच्याकडून आवश्यक ते सहकार्य आणि पाठपुरावा सुरू असल्याचे भारतीय स्टेट बँकेच्या टिंबर मार्केट शाखेच्या प्रशासनाकडून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.एप्रिलअखेर पेन्शन जमा होईलजिल्ह्यातील एकत्रितपणे १ लाख ११ हजार पेन्शनर्स आहेत. बँकांकडून अनेकदा अकौंट नंबरऐवजी पेन्शन नंबर दिला जातो. सह्या नसतात. त्यामुळे कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होऊन पेन्शन जमा होण्यास विलंब होतो. पेन्शनधारकांची संख्या अधिक असल्याने हयातीच्या दाखल्यांचे अद्ययावतकरणाला वेळ लागत आहे. मार्चमध्ये बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक, एचडीएफसी, आदी बँकांतील पेन्शनधारकांची एकत्रितपणे पेन्शनची १२ कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. ज्यांची पेन्शन थकीत आहे, ती एकत्रितपणे ३० एप्रिलपर्यंत जमा करण्यात येईल, असे भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील संबंधित विभागाच्या प्रतिनिधीने सांगितले.
चार महिन्यांपासून रखडलेली पेन्शन द्या
By admin | Published: April 16, 2015 11:56 PM