शिरोली : पश्चिम महाराष्ट्राला फौंड्री हब म्हणून जाहीर करावे. विदर्भ, मराठवाडाप्रमाणे येथील उद्योगांना देखील विजेचे पॅकेज द्यावे, अशी मागणी ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी केली. ‘स्मॅक’मध्ये कोल्हापुरातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.विदर्भ, मराठवाडा आणि डी प्लसमधील उद्योगांना शासन विजेच्या दरात सवलत देत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आॅटोमोबाईल उद्योग हा फौंड्री हब बनत आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राचा आणि फौंड्री उद्योगाचा आणखीन विस्तार होणार आहे. अशा स्थितीत येथील उद्योगांनाही अशी सवलत दिली पाहिजे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना प्राधान्य दिले पाहिजे. देशात कोईमतूर, राजकोट आणि कोल्हापूर येथे उत्तम दर्जाचे कास्टिंग तयार होते, पण सध्या या उद्योगात मंदी आली आहे. याकाळात सरकारकडून मदत अपेक्षित आहे. यावेळी कागल असोसिएशनचे अध्यक्ष संजय जोशी म्हणाले, कोल्हापुरात कुशल कर्मचारी वर्ग असून उद्योजक आधुनिक तंत्रज्ञान वापरतात. त्यामुळे मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगवाढीसाठी मोठी संधी आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर म्हणाले, शासनाने विजेच्या बाबतीत विदर्भ, मराठवाड्याला वेगळे विजेचे पॅकेज देऊन उद्योजकांत दुजाभाव करू नये. बंगलोर येथील उद्योजक आर. के. शहा यांनी आॅनलाईन मार्केटबाबत माहिती दिली. यावेळी स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष राजू पाटील, ‘स्मॅक’चे माजी अध्यक्ष मोहन कुशिरे, संचालक अतुल पाटील, रामराजे बदाले, हरिषचंद्र धोतरे, टी. एस. घाटगे उपस्थित होते.५शासनाने उद्योगांना पॅकेज जाहीर करावे. महाराष्ट्रात लघु उद्योगाचे मोठे जाळे पसरले आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला फौंड्री हब म्हणून प्रसिद्धी द्यावी आणि इचलकरंजीच्या टेक्स्टाईल धर्तीवर कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला विजेचे पॅकेज जाहीर करावे, असेही जैन म्हणाले.
विदर्भप्रमाणे वीज पॅकेज द्या
By admin | Published: February 12, 2016 11:52 PM