कोल्हापूर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापुरातील छोट्या दुकानदारांवर, फेरीवाल्यांना मात्र मोगलाई पद्धतीने प्रशासन नियम लावत आहे. दोन महिने झाले या दुकानदारांचा व्यवसाय बंद आहे. त्याचा विचार करून छोट्या दुकानदारांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी प्रशासनाला दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना मृत्युदरात, कोरोना पॉझिटिव्हिटीत देशात क्रमांक पहिला लागला. वेळोवेळी फक्त कागदोपत्री आदेश काढले जात आहेत परंतु वस्तुस्थितीमध्ये आदेशांचे पालन होताना दिसत नाही. शहरात लॉकडाऊन काळातदेखील रहदारी सुरूच आहे. सकाळी ११ आणि दुपारी ४ यावेळेत मोठ्या फौजफाट्यासह शहरातील प्रमुख चौकात सर्वसामान्य नागरिकांची वाहने अडवून फक्त जोरदार करवसुली सुरू असल्याचे चित्र आहे. कोरोना संकटकाळात गेले दोन महिने व्यवसाय पूर्ण बंद असल्यामुळे या व्यापाऱ्यांवर, सर्वसामान्य नागरिक तसेच हातावर पोट असणाऱ्या छोट्या विक्रेत्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
भाजपवर आरोप करण्यापेक्षा शेजारील भाजपशासित कर्नाटक राज्याप्रमाणे या सर्व वंचित घटकांना त्यांच्या बँक खात्यावर अनुदान देण्याचा प्रयत्न करावा.