सांगली : गेल्या दोन दिवसातील अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आघाडी सरकारच्या कालावधित आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेवढी मदत दिली तेवढी तरी मदत युती शासनाने द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, हरभरा, गहू, ज्वारी अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागले होते. वारंवार उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्याला आता शासनाच्या मोठ्या आर्थिक पाठबळाची गरज आहे. मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना मी जिल्हा प्रशासनांना नुकसानीच्या पंचनाम्याबाबत स्थायी आदेश दिले होते. सध्याच्या स्थितीत शासनाचे असे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे व्हावेत. आघाडी सरकारच्या काळात आम्ही अवकाळी व अन्य संकटांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर तातडीने मदत दिली होती. आम्ही जेवढी मदत दिली किमान तेवढी तरी शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. जादा रक्कम दिली तर चांगली गोष्ट आहे. सिंचन योजनांबाबत विभागीय आयुक्तांशी चर्चा केली, त्यावेळी पूर्ण विभागासाठी केवळ चार कोटी रुपये मंजूर असल्याचे समजले. टंचाईतून योजनांची वीजबिले भागवून योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना अनुशेषाचा फटका बसू नये. सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित निधीही सरकारकडून मिळेल, अशी आशा आहे. जिल्हा बॅँकेसह महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कॉँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे लढविण्यासाठी प्रयत्न राहतील. आता दोन निवडणुकांमधून राष्ट्रवादी शहाणी झाली असेल तर, प्रतिसाद काय मिळतो ते पाहू. (प्रतिनिधी)‘तासगाव-कवठेमहांकाळ’ची निवडणूक लढवू नये!तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांच्यातील कोणाला उमेदवारी मिळाली तर कॉँग्रेसने निवडणूक लढवू नये. त्याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली नसली तरी, आमच्या भावना आम्ही त्यांना कळवू, असे पतंगराव म्हणाले. जिल्ह्याला जिल्हाधिकारी नसल्याने अनेक कामांमध्ये अडथळे येत आहेत. अवकाळीचे संकट जिल्ह्यावर कोसळले असताना जिल्हाधिकारी नसणे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने याठिकाणी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी कदम यांनी यावेळी केली.
आघाडी सरकारएवढी तरी मदत द्या
By admin | Published: March 02, 2015 11:51 PM