कोल्हापूर : अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना मिळवून द्या; राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना तुमच्याकडूनच गोळ्या घेतो, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविले. पाटील यांनी दोन रुपयांच्या गोळ्या २३ रुपयांना खरेदी केल्या जात असल्याबद्दल टीका केली होती. त्याला मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्युतर दिले.मुश्रीफ पत्रात म्हणतात, कोरोना रोखण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम - ३0 हे होमिओपॅथी औषध वापरण्याची शिफारस केली आहे. राज्यात एकूण २७,८७७ ग्रामपंचायती असून ४४,१३७ गावे आहेत. त्यानुसार राज्यातील पाच कोटी ग्रामीण जनतेसाठी होमिओपॅथी औषध अर्सेनिक अल्बम -३० मोफत देण्याची घोषणा केली. पुरवठादार निश्चित करण्यासाठी शासन निर्णयानुसार ०९ जून रोजी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
तांत्रिक लिफाफा २३ जूनला उघडला. त्यात पात्र असणाऱ्या निविदाधारकांचा वित्तीय लिफाफा २६ जूनला उघडण्यात आला. मात्र निविदेतील दर खूपच जास्त आल्यामुळे आणि बाजारात यापेक्षा कमी दराने औषध मिळत असल्याने ही निविदा प्रक्रिया तत्काळ ३० जूनला रद्द करून होमिओपॅथी औषध आणि आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध जिल्हास्तरावर खरेदी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या. असे असताना आपण चुकीच्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करीत आहात.अब्रुनुकसानीचा दुसरा दावाग्रामविकास विभागाने दर जास्त असल्यामुळे अर्सेनिक अल्बमची निविदा प्रक्रिया ३० जूनला रद्द केल्यानंतर आपण ही खरेदी २३ रुपये याप्रमाणे झाली, असा आरोप ३० जूनला जाणीवपूर्वक करून माझी व शासनाची बदनामी केली. यापूर्वी मी आपणावर बदनामीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. चुकीचे आरोप केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि दुसरा फौजदारी दावा दाखल करण्याची वेळ आणू नये, असा इशाराही मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे.