कोल्हापूर : रिक्षा भाडेवाढ करण्यापेक्षा चालकांना शिधापत्रिकेवर रोज तीन लिटर इंधन द्यावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आॅटोरिक्षा संघर्ष समितीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. आल्वारिस यांना मंगळवारी सायंकाळी दिले.
इंधनवाढ, महागाईवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत सापडला आहे. रिक्षाचालकांच्या प्रश्नांबाबत कोल्हापूर जिल्हा आॅटोरिक्षा संघर्ष समितीने मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. आल्वारिस यांची भेट घेतली. याच रिक्षा संघटनांनी काही दिवसांपूर्वी रिक्षाभाडे वाढ द्यावी अशी मागणी केली होती. त्याच मागणीच्या आधारे संघर्ष समितीने रिक्षाचालकांचे प्रश्न उपस्थित केले. जीएसटी, नोटाबंदीमुळे व्यापारी, उद्योजक, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. मंदीच्या विळख्यात रिक्षाचालकही सापडला असून, त्याचा व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यात १ एप्रिल २०१८ पासून रिक्षाचा थर्ड पार्टी विमा साडेसात हजारांच्या घरात पोहोचला असल्याचे रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने डॉ. अल्वारिस यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रवाशांचा विचार करता रिक्षा भाडेवाढ तूर्त देऊ नका; पण त्याऐवजी शिधापत्रिकेवर शासनाने रोज किमान तीन लिटर पेट्रोल प्रतिलिटर ५० रुपये भावाने द्यावे, अशी मागणी केली.
या शिष्टमंडळात करवीर आॅटो रिक्षा संघटनेचे सुभाष शेटे, शेअर-ए-रिक्षा संघटनेचे दिलीप मोरे, आदर्श आॅटो रिक्षा युनियनचे ईश्वर चेन्नी, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे शिवाजी पाटील, महाराष्टÑ रिक्षाचालक संघटनेचे राजेंद्र जाधव, न्यू करवीर आॅटो रिक्षा युनियनचे राजेंद्र थोरावडे, चालक-मालक रिक्षा संघटनेचे राजेंद्र पाटील, हिंदुस्थान रिक्षा युनियनचे सरफुद्दीन शेख, आय कॉँग्रेस रिक्षा युनियनचे विश्वास नांगरे, शिवशक्ती रिक्षा युनियनचे मधुसूदन सावंत, आदींचा सहभाग होता.कोल्हापूर जिल्हा आॅटोरिक्षा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. आल्वारिस यांची भेट घेऊन त्यांना संघटनेच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.