कोल्हापूर : वैद्यकीय व इतर प्रवेशासाठी केंद्रीय व राज्य कोटा प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. त्याकरीता मराठा अर्थिक दुर्बल घटक दाखले काढणे क्रमप्राप्त झाले आहे. मात्र, हे दाखले तहसिल कार्यालयाकडून दिले जात नाहीत. ते त्वरीत मिळावेत. अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. अन्यथा तहसिल कार्यालयाला टाळे ठोकणार , असा इशाराही आंदोलकांतर्फे देण्यात आला.मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मराठा जातीचा दाखला देण्याचे काम स्थगित करण्यात आले आहे. राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण स्थगितीनंतर विद्यार्थ्यांचे नूकसान होऊ नये, म्हणून मराठा समाजाला अनेक योजना निधीसह जाहीर केल्या आहेत. यात स्थगित काळात अर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) दाखले दिले जातील, असे जाहीर केले आहे.
त्यानूसार सध्या वैद्यकीय व इतर प्रवेशासाठी केंद्रीय, राज्य कोटा प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. . त्यात मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरीता अर्थिक दुर्बल घटक दाखले जरूरीचे आहेत. तरीसुद्धा मराठा समाजाची या दाखल्यांसाठी अडवणूक केली जात आहे.
येत्या दोन दिवसांत हे दाखले देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी देसाई यांच्याकडे समाजातर्फे करण्यात आली. यावेळी हे दाखले दोन दिवसांत न दिल्यास १२ तालुक्यातील तहसील कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.यावेळी वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, शशिकांत पाटील, संजयकाका पाटील, धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, मयूर पाटील, दिगंबर साळुंखे, सुशील भांदिगरे, विकास जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, प्रताप नाईक, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.