लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वानरांच्या कळपातील एका अडीच महिन्याच्या चिमुकल्या वानराला काही कुत्र्यांनी हल्ला चढवित गंभीर जखमी केले. मात्र, सुदैवाने येथील सामाजिक कार्यकर्ते, प्राणिमित्र, सर्पमित्र शाम नायर व सुशांत टक्कळगी यांनी त्या वानराची सुटका करून त्यावर प्राथमिक उपचार करीत त्याला प्राण्यांचे डॉक्टर अनिल पाटील यांच्या रुग्णालयात नेऊन त्यावर योग्य ते उपचार केले.शहरातील रुईकर कॉलनीनजीक असलेल्या त्रिमूर्ती स्पोर्टस् कॉलनी येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. डॉ. अनिल पाटील यांनी इंजेक्शन, ड्रेसिंग असे उपचार केले असून, दोन ते तीन दिवस सलग उपचार केल्यानंतरच ते बरे होईल. त्यानंतर वानरांच्या कळपात सोडून द्यावे, असे डॉक्टरांनी सांगितले. सध्या ते वानराचे पिल्लू नायर यांनी काळजी घेण्यासाठी घरीच ठेवले असून त्याला बाटलीतून दूध, फळ असे अन्न दिले जात आहे.वानरांना सध्या जंगलात खाद्य मिळत नसल्याने त्यांचा शहरातील अनेक वस्तीत वावर वाढला आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांचाही अशा वानरांचा पाठलाग करणे, हल्ला चढवून जखमी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यात काही वानर जखमी होतात, तर काहींचा प्राणही जात असल्याचे नायर यांनी सांगितले.