कोल्हापूर : ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील सरांचे शिवाजी विद्यापीठाशी स्थापनेपूर्वीपासूनचे दृढ नाते राहिले. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने सन १९६२ मध्ये नियुक्त केलेल्या पहिल्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. सन १९६५ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभेवर ते निवडून आले होते.विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. सन १९६५ ते १९७८ अशी तब्बल तेरा वर्षे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचेही सदस्य होते. विविध अधिकार मंडळांच्या माध्यमातून आपली शिक्षणविषयक भूमिका वेळोवेळी प्रकट करीत शिवाजी विद्यापीठाला त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे शैक्षणिक व समाजाभिमुख स्वरुप प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. शिवाजी विद्यापीठाने सन २००६मध्ये सर्वोच्च डी.लिट. पदवी प्रदान करून त्यांच्या या योगदानाचा गौरव केला. प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार देऊनही त्यांना सन २०१९ गौरविले. त्यांचे अखेरपर्यंत विद्यापीठाशी स्नेहाचे नाते राहिले.सन २००६ मध्ये शिवाजी विद्यापीठाची सर्वोच्च मानद डी. लिट. पदवी डॉ. एन.डी. पाटील यांना तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली होती.
सन २०१९मध्ये शिवाजी विद्यापीठाचा ‘प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यावेळी शेजारी तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत आदी उपस्थित होते.