विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक विजयी होवोत, की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक. कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत मात्र गुलालाची हमखास उधळण होणार आहे; कारण हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या समोरच राहायला आहेत. तशी या कॉलनीला आतापर्यंत गुलालाची परंपराच राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रांतील बड्या हस्तींची निवासस्थाने या वसाहतीत आहेत. उमेदवाराच्या गावात, शहरात निकालाचे वेगळे अप्रूप कायमच असते. ग्रामपंचायतीला किंवा विधानसभेला आपला उमेदवार निवडून आल्यावर विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांच्या गावांत, गल्लीत मुद्दाम जल्लोष करून गुलाल उधळला जातो. त्यावरून तणाव निर्माण होऊन कार्यकर्त्यांची डोकी फुटल्याच्या घटनाही जिल्ह्यात आतापर्यंत झाल्या आहेत. त्यामुळे कोण पराभूत झाल्यास कुणाच्या दारात पोलीस बंदोबस्त ठेवायचा, याचेही नियोजन पोलीस खात्याकडून केले जाते. त्यामुळे कोण विजयी झाल्यास पराभवाचा उद्रेक कुठे होणार, याचा अंदाज कार्यकर्ते बांधत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी कोल्हापूर मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवार एकाच कॉलनीत राहतात. हातकणंगले मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी यांचे शिरोळ व काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे इचलकरंजी ही गावे तशी परस्परांपासून लांब असल्याने मुद्दाम कुरघोडीची शक्यता नाही. प्रा. संजय मंडलिक यांचे निवासस्थान रुईकर कॉलनीत असले तरी त्यांची राजकीय, जन्म व कर्मभूमी कागल तालुक्यात आहे. धनंजय महाडिक बहुधा २००० सालापासून रुईकर कॉलनीला लागून असलेल्या महाडिक वसाहतीत राहतात. सदाशिवराव मंडलिक खासदार असतानाच त्यांनी सध्याचा बंगला विकत घेतला. तसा या वसाहतीचा इतिहासही रंजक आहे. मूळ नारायणराव रुईकर यांची ही जागा. त्यांनी ती गृहनिर्माण संस्थेला दिली. संस्थेची स्थापना १९४६ची. स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील ही पहिली गृहनिर्माण संस्था असल्याचे सांगण्यात येते. काही मोजके प्लॉट सात हजार, अन्यथा बहुतांश प्लॉट पाच हजार चौरस फुटांचे व काही साडेतीन हजार फुटांचे आहेत. या कॉलनीतील सध्याच्या प्लॉटचा दर तीन-चार कोटी रुपये आहे. मोठे रस्ते, उद्यान, मैदान, सर्वधर्मीयांसाठी मंदिरे अशी ‘आयडियल वसाहत’ म्हणून या कॉलनीची ओळख. माजी महसूलमंत्री बाळासाहेब देसाई, माजी खासदार बाळासाहेब माने, माजी आमदार रवींद्र सबनीस, नानासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते एच. डी. पाटील तथा बाबा, आदी दिग्गज नेत्यांचे या कॉलनीत वास्तव्य राहिले. पुढच्या काळात खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, आदी नेत्यांचे बंगले या कॉलनीत आहेत. माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याही बंगल्याचे काम सध्या सुरूआहे. सुरुवातीला मराठा, जैन समाजाचे प्राबल्य असलेल्या या कॉलनीत आता मराठा समाजाची कुटुंबे कमी झाली असून, सिंधी समाजबांधवांची निवासस्थाने वाढली आहेत.
विजयाचा गुलाल...@ रुईकर कॉलनी!
By admin | Published: May 14, 2014 12:42 AM