लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील अभियांत्रिकी उत्पादने प्रसिद्ध असून, त्यासाठी जागतिक बाजारपेठेत मोठी संधी आहे; परंतु त्या ठिकाणी ही उत्पादने पोहोचू शकत नाहीत; त्यामुळे त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या माध्यमातून पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या मुंबई इन्स्टिट्यूटचे प्रा. वीरेंद्र गुप्ते यांनी शनिवारी येथे दिली.‘वर्ल्ड ट्रेड डे महाराष्ट्र’चा सांगता समारंभ कोल्हापुरात साजरा केला. यानिमित्त शिवाजी उद्यमनगर येथील रामभाई सामाणी हॉल येथे वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई व कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबईचे सहायक संचालक सुरेश घोरपडे, भारतीय लघुउद्योग विकास बॅँक (सिडबी)चे सहायक सरव्यवस्थापक भगवान चंदनानी, स्मॅक-शिरोलीचे अध्यक्ष राजू पाटील यांची होती.गुप्ते म्हणाले, वर्ल्ड ट्रेड सेंटरची ८० देशांत कार्यालये असून, मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे. या सेंटरमुळे कोल्हापूरचे उद्योजक इतर देशांशी जोडले जाऊन ते आपल्या उत्पादनांची माहिती ट्रेड सेंटरच्या वेबसाईटवर टाकू शकतात. त्यामुळे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचून योग्य संधी प्राप्त होेऊ शकते. उत्पादन निर्यात करताना त्याचा विमा उतरविणे गरजेचे आहे. हे काम वर्ल्ड ट्रेड सेंटर व ‘ईसीजीएस’ संस्थेच्या माध्यमातून केले जाते. सुरेश घोरपडे म्हणाले, वर्ल्ड ट्रेड डे भारतात प्रथमच महाराष्ट्रात साजरा केला. याची सुरुवात १८ मे रोजी मुंबई येथे झाली. त्यानंतर २२ मे रोजी नाशिक, २४ मे रोजी पुणे, २५ मे रोजी नागपूर, २६ मे रोजी औरंगाबाद येथे कार्यक्रम होऊन शनिवारी कोल्हापुरात याची सांगता केली. भगवान चंदनानी यांनी ‘सिडबी’च्या माध्यमातून सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांकरिता असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. मार्चपर्यंत अंदाजे २६ हजार ६०० कोटी रुपये अनुदान विविध उद्योगांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब कोंडेकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रदीप व्हरांबळे यांनी आभार मानले.कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगर येथील रामभाई सामाणी हॉल येथे शनिवारी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई व कोल्हापूर इंजिनिअरिंग असो.तर्फे आयोजित चर्चासत्रात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या मुंबई इन्स्टिट्यूटचे प्रा. वीरेंद्र गुप्ते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवान चंदनानी, बाबासाहेब कोंडेकर, सुरेश घोरपडे, राजू पाटील, आदी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या अभियांत्रिकी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत संधी : गुप्ते
By admin | Published: May 28, 2017 1:04 AM