गारगोटी : ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या आंतरराष्ट्रीय संशोधन मानांकन संस्थेने २०२१ या वर्षासाठी प्रकाशित केलेल्या जागतिक स्तरावरील अव्वल संशोधकांच्या यादीत गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयातील डॉ. शरद व्हनाळकर व डॉ. सागर व्हनाळकर दोन युवा संशोधकांनी स्थान मिळवले आहे. जगातील सुमारे १६७ देशांतील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थेत कार्यरत नामवंत संशोधकांच्या यादीत स्थान मिळवून या दोन संशोधकांनी मौनी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या संस्थेने जगातील सुमारे १६७ देशांतील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थेत कार्यरत शास्त्रज्ञांचे गेल्या पाच वर्षांतील संशोधन कार्य, त्यांची प्रकाशने, त्यांचा दर्जा, प्रकाशनांचा संदर्भ म्हणून इतर संशोधकांनी केलेला वापर, एच व आय इंडेक्स आदी निकष वापरून ही यादी तयार केलेली आहे. या यादीत डॉ. शरद व्हनाळकर यांचा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व नॅनो तंत्रज्ञान या क्षेत्रात तर डॉ. सागर व्हनाळकर यांचा कृषी, पर्यावरण व जीवशास्त्र या क्षेत्रात समावेश आहे.
डॉ. शरद व्हनाळकर हे सध्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागप्रमुख म्हणून व डॉ. सागर व्हनाळकर हे प्राणीशास्त्र विभागप्रमुख तसेच बी. एस्सी. विभागाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. या दोघे बंधू निगवे खालसा (ता. करवीर) येथील असून त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातीलच चनीशेटी विद्यालयात पूर्ण झालेले आहे. या दोघांचे पदव्युत्तर व पीएच. डी. शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केलेली आहे. डॉ. शरदराव व्हनाळकर यांनी यापूर्वी चेनोम राष्ट्रीय विद्यापीठ, ग्वान्गझू (दक्षिण कोरिया), ओहायो विद्यापीठ, (अमेरिका), कोच विद्यापीठ, तुर्की येथे संशोधन केलेले आहे. याशिवाय त्यांनी भारत सरकारचा युवा संशोधक पुरस्कारही मिळवला आहे. त्यांनी सौरघट निर्मितीसाठी विविध संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले असून त्यांच्या नावावर एक पेटंटही आहे. या दोन युवा संशोधकांना पालकमंत्री सतेज पाटील याचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे चेअरमन आशिष कोरगावकर, संचालक प्राचार्य डॉ. आर. डी. बेलेकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांचे सहकार्य मिळाल्यानेच हे धवल यश संपादन केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
१) डॉ. शरद व्हनाळकर २) डॉ. सागर व्हनाळकर