कोल्हापूर : जिल्ह्यात ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी. समितीच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य परिस्थिती पाहावी व त्यावर आधारित कृषी आराखडा सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत त्यांनी व्हिसीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार
ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, चालू वर्षी वेधशाळेने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र येणार आहे, कोणत्या ठिकाणी किती पाऊस होतो, कोणत्या प्रकारची पिके किती क्षेत्रावर होतात, याबाबतची वस्तूनिष्ठ आकडेवारी हवी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतावर जाणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत असून, माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. तरी खतांच्या १० टक्के कमी वापराबद्दल नियोजन करावे, चहाची शेती व कृषी पर्यटनाबाबत नाविण्यपूर्ण प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. पीक कर्ज लवकर कसे उपलब्ध होईल, याबाबतही नियोजन करा
-
एक खिडकी योजना
मंत्री भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या, अडीअडचणी मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालयात एक खिडकी योजना राबवावी. युरियासोबतच कोणत्या जिल्ह्यात किती वाण लागतो, याचा अभ्यास करून बफर स्टॉक करावा.
--
फोटो नं ०९०४२०२१-कोल-कृषी बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्हिसीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
-