कोल्हापूर :गोवा बनावटीची विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला आज, शनिवारी शहरातील देवल क्लब चौक परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडले. या प्रकरणी संशयित विजयकुमार विलास बनसोडे (वय २३, रा. जिल्हा परिषद कॉलनी, बोंद्रेनगर, कोल्हापूर. मूळ रा. किल्लारी, जि. लातूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून वाहनासह विदेशी मद्य असा सुमारे २ लाख ५६ हजार ६७० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, शुक्रवारी (दि. २) राजारामपुरी परिसरात शाहू मिल कॉलनी येथे बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी मद्य बाळगल्याप्रकरणी संशयित दिलीप दत्तात्रय नलवडे (६०, रा. पांजरपोळ, कोल्हापूर) याला अटक केली. त्याच्याकडून विविध ब्रॅण्डचे सुमारे दहा हजार ३४० रुपये किमतीचे मद्याचे दोन बॉक्स जप्त केले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की, रविवार पेठ परिसरातील देवल क्लब चौकातून चारचाकी वाहन (क्रमांक : एमएच ०९-एन ६००५) घेऊन संशयित विजयकुमार बनसोडे हा जात होत्या. त्यावेळी पथकाने त्याचे वाहन अडविले. त्यामध्ये बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. ते जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय उपायुक्त संगीता दरेकर, अधीक्षक आर. एन. कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. निरीक्षक संजय जाधव, दुय्यम निरीक्षक व्ही. एस. मोरे, जे. एन. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक पी. बी. काळे, रणजित येवलुजे, आर. वाय. गडकरी, दिवटणकर, राहुल सपकाळ यांनी केली.
गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त
By admin | Published: October 04, 2015 12:39 AM