कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील कूर गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. १८) रात्री गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारा मालवाहतूक कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आला.
यामध्ये २३ लाख ३ हजार ७६० रुपये किमतीच्या विदेशी मद्यासह ३२ लाख आठ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक हरीश केशव गौडा (२९, रा. कासूर गौड, ता. होन्नावर, जिल्हा कारवार) यास ताब्यात घेण्यात आले.गारगोटी रस्त्यावरून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील अधिकाऱ्यांनी भुदरगड तालुक्यातील कूर गावच्या हद्दीत कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर बसस्थानक चौकात सापळा लावला.
रात्री नऊ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे मालवाहतूक कॅन्टर वाहन येत असल्याचे दिसले. ते थांबवून वाहनात काय आहे अशी विचारणा करून तपासणी केली. प्रथमदर्शनी वाहनाचा हौदा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसून आले. खात्रीशीर माहिती मिळाली असल्याने कर्मचाऱ्यांनी वाहनाची कसून तपासणी केली.
यात हौद्यामध्ये वर असलेल्या पत्र्याच्या प्लेटांची पाहणी केली असता चोरकप्पा असल्याचे आढळून आले. या पत्र्यांच्या प्लेटा काढल्यानंतर आतील कप्प्यांत विविध ब्रँडचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळले.
रॉयल क्लासिक, मॅकडॉल क्र. १, रॉयल स्टॅग, इंपेरिअल ब्लू, ब्लेंडर प्लाईड व्हिस्की, तसेच गोल्ड ॲण्ड ब्लॅक रम या ब्रँडच्या ७५० मि.लि. क्षमतेच्या बाटल्या असलेले ३६१ बॉक्स मिळाले. बाजारभावानुसार त्याची किंमत २३ लाख ३ हजार ७६० आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, आदींनी सहभाग घेतला.