उत्तूर : गोवा बनावटीची दारूची अवैध वाहतूक करणारा टेम्पो आजरा बसस्थानकाजवळ येणार असल्याची माहिती राज्य दारू उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला दुपारी मिळाल्यानंतर छापा टाकून २० लाख ९८ हजार ६०० रु. मद्यसाठा व टेम्पो जप्त करण्यात आला. याप्रकरणी ओंकार बळीराम मुळे (वय २३, रा. वडगाव सिद्धेश्वर, ता. उस्मानाबाद जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली. गोवा येथून आयशर टेम्पो (एम.एच. ०९ बी.सी. ३८३७) मधून अवैध दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य दारू उत्पादन शुल्काच्या पथकाने टेम्पो थांबवून टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये दारू आढळून आली. दारू लपवून ठेवण्यासाठी टेम्पोत विशिष्ट प्रकारचे कप्पे करण्यात आले होते. यातून गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या ६८४० प्लास्टिक बाटल्या व ३६ सीलबंद काचेच्या बाटल्या आढळून आल्या.
उत्पादन शुल्क अधीक्षक संध्याराणी देशमुख, उपअधीक्षक बी. आर. चौगुले, निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार आदींसह पथकाने कारवाई केली.
१८ आजरा दारू
फोटो ओळी . आजरा येथे राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडलेली दारू व आयशर टेम्पो.