चंदगड प्रतिनिधी : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एकास झांबरे येथे ताब्यात घेतले. या प्रकरणी गुरुवारी चंदगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ५ लाख ९५ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईत सतीश ऊर्फ चिमाजी भीमराव आर्दाळकर (वय ३३, रा. अडकूर, ता. चंदगड) याला अटक केली आहे. गुरुवारी पहाटे चंदगड पोलिसांतील अंमलदार पो. शि. सोनुले यांना मिळालेल्या माहितीनुसार अडकूर येथील सतीश हा तळकट (जि. सिंधुदुर्ग) मार्गे झांबरे (ता. चंदगड) गावातून अडकूर येथे गोवा बनावटीच्या दारूची चोरून वाहतूक करणार होता. त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचून सहाच्या सुमारास झांबरे येथील रवळनाथ मंदिराच्या बाजूच्या रोडने चंदगडकडे जाणाऱ्या चारचाकी (सुमो गाडी नं. एम एच-१२ -ए एन -८६२१) ही येताना दिसली. त्यास थांबवून सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले. या कारवाईत २ लाख ४५ हजार १६० रुपये किमतीचे ४६ बॉक्स दारू व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची सुमो गाडी असा एकूण ५ लाख ९५ हजार १६० रुपये किमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचा कर चुकवून घेऊन जाताना जप्त केला. या प्रकरणी सतीश ऊर्फ चिमाजी भीमराव आर्दाळकर यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बांबळे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहिदास नांगरे, पोलीस शिपाई विजय सोनुले आणि अनिल अष्टेकर यांनी केली आहे.