कोल्हापूर : यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील वृक्षारोपणालाही बसला आहे. ७ जुलैला पावसाने सलामी दिल्यानंतर विविध खात्यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणास प्रारंभ केला. त्यामुळे या खात्यांना वृक्षारोपणाचे आपले उद्दिष्ट उद्याप गाठता आले नाही. या खात्यांमार्फत वृक्षारोपणाची मोहीम आॅगस्टअखेर राबविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात ३३ टक्के वनांची निर्मिती करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पावले उचलली आहेत. शासनामार्फत ३३ टक्क्यांच्या उद्दिष्टापर्यंंत पोहोचण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, वृक्षारोपणाच्या उद्दिष्टाला पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे ब्रेक लागला. पाऊस उशिरा का सुरू झाला? त्याची कारणे काय? याचे उत्तर आहे प्रचंड वृक्षतोड. एकीकडे शासनाकडून वृक्षारोपणाची जोरदार मोहीम राबविली जात असताना, दुसरीकडे मात्र वृक्षतोडीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची स्थिती आहे. विविध औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी उद्या, बुधवारी होणाऱ्या वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने नागरिकांबरोबर विविध शासकीय खात्यांनी वृक्षसंवर्धनाच्या सामाजिक जबाबदारीसाठी विडा उचलणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राखीव, संरक्षित, अवर्गीकृत, खासगी संपादित वने असे एकूण १३९१.१९ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण या विभागांबरोबर जिल्हा परिषद, कृषी, उपनिबंधक कार्यालय, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभागांनाही वृक्षारोपणाच्या मोहिमेत शासनाने सहभागी करून घेतले आहे. या विभागांना वेगवेगळे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात केवळ प्रादेशिक वन विभागाने ८ लाख २७ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या विभागाकडे इतर विभागांच्या तुलनेत यंत्रणाही मोठी आहे. त्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे इतर विभागांचे उद्दिष्ट मागे पडले आहे. सामाजिक वनीकरणाला दिलेल्या २ लाख ३६ हजारांपैकी केवळ १८ हजार, ‘शतकोटी’चे ८२ लाख ५६ हजार पैकी केवळ १० लाख ८७ हजार इतकेच वृक्षारोपण झाले आहे. या विभागांकडून उर्वरित उद्दिष्ट आॅगस्ट अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘शतकोटी’चे उद्दिष्ट अपूर्ण
By admin | Published: July 23, 2014 12:20 AM