इचलकरंजी : इस्लाम धर्मातील त्याग व पवित्र भावनेचा उत्सव म्हणजे बकरी ईद. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहर व परिसरात ईद साधेपणाने साजरी करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुस्लिम बांधवांनी घरांमध्ये नमाज अदा करून बुधवारी ईद साजरी केली. मशिदींमध्ये काही प्रमुख मौलवींनी ईदचे नमाज पठण केले. सालाबादप्रमाणे यावर्षीही बकरी ईदचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. मशिदींमध्ये गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. प्रशासनाच्या आवाहनानुसार समाजप्रमुखांनी बांधवांना कोरोना नियमांचे पालन करून काळजी घेत सण साजरा करण्याचे सांगितले. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाज बांधवांचा हिरमोड झाला आहे.
चौकट
सलग दुसऱ्या वर्षी नमाज रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज पठण रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान सुनेसुने दिसत होते. रमजान ईदचे सामूहिक नमाज पठणही रद्द केले होते.