कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची २१ तारखेला होणारी बकरी ईद मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने साजरी करावी व शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, अशा सूचना प्रभारी जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.
कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
सध्या सुरू असेलल्या असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. जनावरे खरेदी करायची असल्यास नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधावा तसेच शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. जिल्ह्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध कायम असून त्यात बकरी ईदनिमित्त कोणतीही सूट देण्यात येणार नाही. यादिवशी नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
---