घन:शाम कुंभार --यड्राव--मुलांना घडविण्याचे कर्तव्य असले तरी त्यासाठी केलेली धडपड, त्यातून मुलांवर झालेले सुसंस्कार आणि मुलांनी जिद्दीने घडविलेले वेगवेगळ्या क्षेत्रामधील कर्तृत्व सामोरे येताना वडीलधारी मंडळी कृतार्थ होतात. अशा विविध क्षेत्रांत यशवंत ठरलेल्या मुलांच्या १२० पालकांचा सत्कार झाला अन् त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूसह आयुष्याच्या सांजवातेला शरण तुला भगवंता!, अशी कृतज्ञता व्यक्त झाली. हा उपक्रम येथील सेव्हन स्टार ग्रुपने राबविला.येथील पार्वती हौसिंग सोसायटी, प्रियदर्शनी अपार्टमेंट व कुंभोजे मळा परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी कठोर परिश्रमांनी आपले घर, संसार सांभाळत मुला-मुलींना चांगले शिक्षण दिले. त्या शिक्षणाच्या जोरावर येथील मुले पुणे, मुंबई, कुवेत, बंगलोर, अमेरिका यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या कंपन्यांत मोठ्या हुद्द्यावर नोकरीस आहेत, तर काही मंडळींनी शेतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून सुधारित शेती, वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. ते आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले आहेत.सुमारे तीस-चाळीस वर्षांच्या कालावधीत या मंडळींनी सामाजिक सलोखा, बंधुत्व व एकसंघपणा कायम टिकविला असल्याने एकमेकांबद्दलचे ऋणानुबंध वाढीस बळ मिळाले आहे. अशा या १२० ज्येष्ठ नागरिकांपकैी २३ दाम्पत्यांसह ७४ नागरिकांचा कृतज्ञता म्हणून शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, तर महिलांना शाल, श्रीफळ, ब्लाऊज पीस, गुलाबपुष्प देऊन येथील सर्वांत ज्येष्ठ असलेल्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या उपक्रमात सचिन येलाजा, सचिन मगदूम, विनायक शेट्टी, प्रदीप हिंगे, उदय कुंभार, सचिन गरड, संजय पाटील, बाबासाहेब राजमाने, भरतेश मगदूम, संदीप येलाजा, प्रशांत गोखले, पुष्पराजसिंह हजारी, मनोज पाटील यासह मंडळातील सर्व सदस्यांचा सहभाग होता. ग्रामपंचायत सदस्या कल्पना लढ्ढा व लक्ष्मीकांत लढ्ढा यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. या सत्कारातून सर्वच ज्येष्ठ नागरिकांमधून ‘आयुष्याच्या सांजवातेला शरण तुला भगवंता!’ अशी कृतज्ञता व्यक्त झाली.
आयुष्याच्या सांजवातेला शरण तुला भगवंता!
By admin | Published: November 03, 2015 9:33 PM