कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे जोतिबा रोडवरील मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रा स्ट्रक्चर कंपनीत काम करणा-या कामगाराने पेटत्या विडीचे थोटूक टाकल्याने गोडाऊनला आग लागली. सोमवारी (दि. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या प्रकारात गोडाऊनमधील साहित्य जळून सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत संशयित कर्मचारी ओमप्रकाश विश्वकर्मा (वय २५, सध्या रा. केर्ली, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रा स्ट्रक्चर कंपनीचे गोडाऊन केर्ली येथील जोतिबा रोडलगत आहे. या गोडाऊनमध्ये रस्ते बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि यंत्रसामग्री ठेवली होती. ओमप्रकाश विश्वकर्मा हा कामावर असताना विडी ओढून पेटते थोटून त्याने गोडाऊनमध्येच टाकले. थोटकामुळे वाळलेल्या गवताला लागलेली आग सर्वत्र पसरली. या आगीत गोडाऊनमधील एक ट्रक आणि इतर साहित्य जळून खाक झाले.याबाबत कंपनीचे अधिकारी धर्माराव सन्यासी लोट्टी (वय ३०, सध्या रा. केर्ली, मूळ रा. आंध्रप्रदेश) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित ओमप्रकाश विश्वकर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनास्थळाची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतल्याची माहिती करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
Kolhapur: विडीच्या थोटकाने गोडाऊनला आग; कामगाराचा निष्काळजीपणामुळे कंपनीचे ७० लाखांचे नुकसान
By उद्धव गोडसे | Published: March 27, 2024 3:58 PM