कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या निवडणूकीत महिला राखीव गटातून सुश्मिता पाटील पराभूत झाल्या. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या त्या बहिण व चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी होत. घराण्याच्या पुण्याईवर लोक आता निवडून देत नाहीत असाच या पराभवाचा अर्थ आहे.खरे तर आमदार राजेश पाटील हे स्वत: संघाचे संचालक होते. त्यामुळे त्यांनीच सर्वसाधारण गटातून ही निवडणूक लढवावी असा आघाडीच्या नेत्यांचा आग्रह होता. परंतू त्यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवायची असल्याने गोकूळला पत्नीस रिंगणात उतरवले. मंडलिक यांचा नातू विरेंद्र मंडलिक याच पॅनेलमधून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एकाच मंडलिक कुटुंबातील कन्या व भाचा असे दोन उमेदवार झाल्यास त्यातून नकारात्मक चित्र लोकांत जाईल अशीही चर्चा उमेदवारी देताना झाली होती. परंतू ते आग्रही राहिल्याने सुश्मिता पाटील यांना उमेदवारी मिळाली.
चंदगड-आजरा तालुक्यात दिवंगत नेते नरसिंगराव पाटील यांना मानणारा जरुर चांगला गट आहे. परंतू तेवढ्यावर गोकूळचा विजय होत नाही. त्यासाठी जिल्हाभर यंत्रणा लावायला हवी होती त्यामध्ये ते पुरते गाफील राहिल्यानेच हा पराभव झाला. या गटातून सत्तारुढ आघाडीतून दोन्ही उमेदवार मातब्बर होते. त्यामुळे तरी त्यांनी जास्त जागरूक राहून सर्व पातळ्यावर निवडणूक हातात घेतली असती आणि हातही सैल सोडला असता तर विजय अवघड नव्हता.