विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारुढ गटाला खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील उर्फ आबा, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील उर्फ आबाजी यांनीही विरोधी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्यासह आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर हे देखील विरोधी आघाडीचे उमेदवार असतील, हे स्पष्टच आहे. संघाच्या निवडणुकीतील निकालावर निर्णायक परिणाम करणाऱ्या या घडामोडी आहेत. विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले.
सत्तारुढ गटातील ज्यांच्याकडे मतांचे पॉकेट आहे, अशा संचालकांची भूमिका निकालात महत्त्वाची ठरते. डोंगळे यांनी अगोदरच मुश्रीफ यांच्या माध्यमातून विरोधी आघाडीस बळ दिले आहे. विश्वास पाटील यांचाही कल तसाच होता; परंतु त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सत्तारुढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांची भेट घेऊन माजी आमदार महादेवराव महाडिक यांची संगत करणार नसल्याचे स्पष्ट केले. महाडिकांना सोडून आघाडी करत असाल तर मी तुमच्यासोबत आहे, असेही विश्वास पाटील यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते. विश्वास पाटील यांनी स्वत:हून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असतानाही महाडिक यांनी त्यांचा अवमान करून राजीनामा घेतल्याने ते त्यांच्या जिव्हारी लागले. त्यामुळेच ते आता महाडिक सोडून बोला, असे म्हणत आहेत. डोंगळे यांच्या विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी केलेले विधान नाराजीचे कारण ठरले. डोंगळे, आबाजी व शशिकांत चुयेकर यांनी एकत्रित ठराव जमा केले आहेत. चुयेकर यांचा निर्णय डोंगळे-आबाजींच्या भूमिकेवर अवलंबून होता. त्यामुळे चुयेकरही विरोधी आघाडीचे उमेदवार ठरू शकतात.
राजेश पाटील पक्षीय बंधनामुळे
आमदार राजेश पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना उमेदवारी मिळवून देऊन आमदार करण्यात मुश्रीफ यांचे मोठे पाठबळ असल्याने ते मुश्रीफ यांच्यासोबत राहणार, हे स्पष्टच आहे. शाहूवाडीत स्थानिक राजकारणात कर्णसिंह गायकवाड कोरे गटाबरोबर राजकारण करतात; परंतु त्यांनीही गोकुळला आपण सतेज पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचा पवित्रा घेतला आहे.
मर्यादित ठराव
शाहूवाडीच्या राजकारणात सत्यजित पाटील व कोरे यांच्यात संघर्ष आहे. सत्यजित पाटील यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याने आमदार कोरे हे सत्तारूढ आघाडीसोबत राहू शकतात. त्यांना एक किंवा दोन जागा मिळू शकतात. त्यांचा स्वत:चा दूध संघ असल्याने त्यांच्याकडे मर्यादित ठराव आहेत.
नरके यांचेही प्रयत्न..
सत्यजित पाटील यांना विरोधी आघाडीसोबत आणण्यात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेकडून दोन खासदारांसह पक्षांतर्गतही ताकद त्यासाठी उपयोगी पडली आहे. पालकमंत्री पाटील यांनी सत्यजित यांच्यासाठी बरीच जोडणी लावली होती. दोन दिवसांपूर्वी महाडिक हे सत्यजित यांच्या कोल्हापुरातील घरी जावून भेटून आले होते.
सत्तारुढ गटाची आज बैठक
आमदार पी.एन.पाटील यांनी आज शुक्रवारी करवीर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयात ही बैठक होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता महादेवराव महाडिक यांच्यासोबत प्रमुख संचालकांची बैठक होत आहे.