कोल्हापूर : मुंबईतील दूध वितरकांनी लिटरला दोन रुपये कमिशन वाढ मागितल्याने राज्यातील प्रमुख दूध संघ हवालदिल झाले आहेत. वितरकांनी २२ एप्रिलपासून दूध वितरण करणे बंद केल्याने ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघांच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे दररोज ८० हजार लिटर दूध शिल्लक राहू लागले आहे. मुंबई येथील वितरकांना प्रतिलिटर चार रुपये कमिशन दिले जाते; पण त्यांच्यामध्ये मुख्य वितरक, उपवितरक अशा तीन-चार शाखा झाल्याने कमिशनमध्ये वाटेकरी वाढले आहेत, त्यामुळे त्यांनी प्रतिलिटर दोन रुपये वाढ मागितली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाचे दर कोसळल्याने खासगी कंपन्यांनी सर्व दूध मार्केटमध्ये आणले आहे. हे दूध खपविण्यासाठी खासगी कंपन्या वितरकांना मागेल तेवढे कमिशन देत असल्याने, तसेच सहकारी दूध संघांनी कमिशन द्यावे, अशी मागणी वितरकांची आहे. त्यामुळे तेही संघांना शक्य नाही. ‘गोकुळ’ दूध संघाचे सहा लाख लिटर दूध मुंबईमध्ये विक्री होते. पैकी ७० हजार लिटर दूध वितरणावर परिणाम झाला. ‘वारणा’चे एक लाख ६० हजार लिटर विक्री होते. मात्र, विक्रीवर आतातरी फारसा फरक दिसत नाही. परंतु, आज, शुक्रवारपासून वितरणावर परिणाम होईल, असा अंंदाज आहे. दुधाच्या दरवाढीबाबत सरकारचा दबावदूध संघांना ही वाढ देण्यात कोणती अडचण येणार नाही; पण त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे दरवाढ करू नये, असा सरकारचा दूध संघांवर दबाव आहे.‘गोकुळ’ची निवडणूक नुकतीच झालेली आहे. अजून चेअरमन निवड व्हायची आहे. वितरकांच्या मागणीबाबत संघ सकारात्मक आहे, त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजेत, याबाबत दुमत नाही.- डी. व्ही. घाणेकर, कार्यकारी संचालक, गोकुळ
‘गोकुळ’, ‘वारणा’च्या दूध वितरणला फटका
By admin | Published: May 01, 2015 12:26 AM