लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची अनामत रक्कम परत करण्यास सुरुवात झाली आहे. सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयात संबंधित रकमेचा धनादेश मिळणार असून ३१९ जणांची साडेपाच लाख रुपये अनामत रक्कम जमा झाली होती.
‘गोकूळ’च्या निवडणुकीत २१ जागांसाठी ४९२ अर्ज दाखल झाले होते. अनुसूचित जाती, जमाती गटातील इच्छुकांना ५०० रुपये तर सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग, भटक्या जाती विमुक्त जमाती, महिला प्रवर्गासाठी दोन हजार रुपये अनामत रक्कम होती. त्यातही एका गटातून एकाच अनामत रकमेवर कितीही अर्ज दाखल करता येतात. दुसऱ्या गटातून अर्ज दाखल करायचा झाल्यास त्याची अनामत रक्कम वेगळी भरावी लागते. त्यानुसार ‘गोकूळ’साठी तब्बल ४८२ अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर २१ जागांसाठी दोन आघाड्यांचे ४२ व तीन अपक्ष असे ४५ जण रिंगणात होते.
निवडणुकीनंतर संबंधितांची अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयातून या रकमेचा धनादेश संबधितांना देण्यात येणार आहे.
तिघांची अनामत जप्त
सहकारी संस्थांच्या निवडणुकीत वैध मताच्या १/६ मते पडले तर संबंधित उमेदवाराची अनामत रक्कम अबाधित राहते. मात्र ‘गोकूळ’च्या निवडणुकीत शामराव बेनके यांना १८, वैशाली पाटील यांना १२ तर दिनकर कांबळे यांना १९ मते मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या अनामत रक्कमा जप्त करून निवडणूक प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.
कोट-
‘गोकूळ’ निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्यांची अनामत रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधितांनी पंधरा दिवसात कार्यालयीन वेळेत येऊन आपल्या अनामत रकमेचे धनादेश घेऊन जावेत.
- डॉ. गजेंद्र देशमुख (सहाय्यक निबंधक दुग्ध)