विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्यत: सीमाभागाशेजारी असलेल्या बल्क कुलरच्या दूध पुरवठ्यामध्ये संगनमताने डल्ला मारला असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. हा डल्ला सुमारे दोन कोटींहून जास्त रकमेचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. संघाने त्याची चौकशी सुरू केली असून, २० सुपरवायझरांची तडकाफडकी बदली केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य काही कारवाई केली जाऊ नये म्हणून या प्रकरणावर तूर्त पडदा टाकल्याचे सांगण्यात येते.कमी संकलन असलेल्या गावांतील दूध वाहतूक रोज करावी लागू नये व त्यावर जास्त खर्च होतो म्हणून संघाने बल्क कुलर यंत्रणा उभी केली. संघाने पुरविलेले असे २७ बल्क कुलर आहेत. त्यांची क्षमता प्रत्येकी ५ ते १० हजार लिटर इतकी आहे. जिथे ‘गोकुळ’ची दूध संस्था आहे, तिथे त्या संस्थेमार्फतच ही व्यवस्था सांभाळली जाते. त्यांना लाईट बिल, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांना प्रती दोन हजार लिटरला २७५ प्रमाणे हाताळणी खर्च दिला जातो; परंतु जिथे संंघाचे नेटवर्क नाही, त्या शेजारच्या कर्नाटकातील काही गावांत, जत तालुक्यातील बनाळी व शिरोळ परिसरात असे बल्क कुलर ठेकेदारांमार्फत चालविले जातात. त्यांतील काहींचे संघाच्या कारभारी मंडळींशी लागेबांधे आहेत. संकलन, बल्क कुलर व्यवस्था ही त्यांच्याच यंत्रणेमार्फत चालविली जाते. त्यांनी गाईचे दूध हे म्हशीच्या दुधात मिसळून पुरवठा केल्याची तक्रार आहे. त्याशिवाय संघाकडून लिटरला २२ रुपये दर घ्यायचा आणि स्थानिक ठेकेदारांनी प्रत्यक्ष उत्पादकाला मात्र १८ ते २० रुपयेच द्यायचे असे घडले आहे. त्यातून लिटरमागे दोन रुपये कमिशन हडप केल्याचे पुढे आले आहे. त्याशिवाय वाहतुकीच्या बिलातही काही गैरव्यवहार घडल्याचे समजते. याची कुणकुण लागल्यावर संघाने त्याची चौकशी करण्यासाठी संकलन, गुणवत्ता नियंत्रण व पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली.त्यांनी चौकशी करून संघाला अहवाल दिला आहे. त्या आधारे त्या परिसरातील सुपरवायझरांनी याबद्दल संघाला तातडीने सतर्क करायला हवे होते; परंतु ते केले नाही म्हणून अशा २० जणांच्या बदल्या तावरेवाडी व अन्यत्र करण्यात आल्या. यामध्ये नक्की किती रकमेचा गैरव्यवहार झाला आहे याबद्दल मात्र दुजोरा मिळू शकला नाही.
‘गोकुळ’च्या बल्क कुलर व्यवस्थापनात घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:52 AM