कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करत असल्याचे स्वत:च सभेत सांगितले असताना पुन्हा दगाफटका करण्याचा उद्देश त्यांचा दिसतो. आता फसवणूक केली तर दूध उत्पादक संचालकांना गावात फिरू देणार नाहीत आणि त्यांना फसवणूक करायचीच असेल तर ती करावीच, असे उघड आव्हान आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.पाटील म्हणाले, ‘सत्तारूढ गटाने जे दूध संस्थेचे प्रतिनिधी नाहीत, अशा लोकांना आणून बसविले होते. त्याच लोकांनी गोंधळ सुरू केला. आमचे म्हणणे एवढेच आहे, रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी करावी. त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, ते त्यांनी बघावे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील निकालाची धास्ती घेऊनच मल्टिस्टेटचा ठराव रद्द केला आहे....तर ताकदीने सभेला गेलो असतो.अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा ठराव रद्द केल्याचे जाहीर केले. त्यात आमदार पी. एन. पाटील यांनी स्वत: आमदार हसन मुश्रीफ यांना फोन करून, ‘हा ठराव रद्द करत आहे, तुम्ही सभेला जाऊ नका’, असा निरोप दिला; त्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही, असा दगाफटका करणार असतील तर आम्ही सगळे ताकदीने गेलो असतो, असे सतेज पाटील यांनी सांगितले.जीत भी मेरी और...सत्तारूढ गट आता कोणताही निर्णय घेऊ दे, कितीही फसवणूक करू देत. आता ‘जीत भी मेरी और पट भी मेरा’ असल्याचे पाटील यांनी सांगितले.प्रसिद्धीसाठी विरोधकांकडून गोंधळ-रवींद्र आपटे मल्टिस्टेटबाबत सविस्तर खुलासा केला असताना केवळ प्रसिद्धीसाठी काही मंडळींनी गोंधळ घातला; पण बहुसंख्य सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मागील सभेचे प्रोसीडिंग रद्द करण्याची कायद्यात तरतूद नाही. ठराव झाला, दोन राज्यांची मंजुरी मिळाली आणि केंद्रीय मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याबाबत दूध उत्पादकांच्या मनात गैरसमज आहेत, ते दूर केल्याशिवाय आम्ही मल्टिस्टेट करणार नाही. याबाबत सरकारच्या पातळीवर जो काही पाठपुरावा करावा लागेल, तो केला जाईल.
भविष्यात दूध उत्पादकांकडून मागणी झाली आणि गरज निर्माण झाली तर त्यावेळची परिस्थिती पाहून मल्टिस्टेटबाबत निर्णय घेऊ, कारण नसताना ताणतणाव नको, म्हणून आम्ही निर्णय घेतला. विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन सुरू असताना काही लोकांनी गोंधळ सुरू केला; पण बहुसंख्य सभासद आमच्या बाजूने होते; त्यामुळे सभेचे कामकाज शांततेत पार पडल्याचे आपटे यांनी सांगितले.