लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा खर्च यंदा पाचपटीने वाढणार आहे. कोराेनाचा वाढता संसर्ग, त्याबाबतची दक्षता घेऊन मतदान व मतमोजणी यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी खर्च वाढत आहे. त्याचबरोबर राजकीय इर्षा टोकाला जाणार असल्याने सुरक्षा यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. हा सगळा खर्च पन्नास लाख रुपये अपेक्षित असून, मागील निवडणुकीत अकरा लाखांत सगळी निवडणूक पार पडली होती.
निवडणूक घेणे हे संस्थेच्यादृष्टीने खर्चिक बाब आहे. काही जिल्हास्तरीय संस्थांची आर्थिक ताकद नसतानाही कर्जे काढून निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची २००७ ची निवडणूक पणन मंडळाकडून कर्ज काढून घ्यावी लागली होती. सध्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत झाली आहे. मात्र सत्तारूढ व विरोधी आघाडीमधील इर्षा पाहता, निवडणूक कोणत्या स्तराला जाईल, हे सांगता येत नाही. मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदारांचे वारसदार रिंगणात उतरणार असल्याने टोकाचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून तैनात करण्यात आली होती. त्याशिवाय मतदान आणि मतमोजणीलाही पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळे त्यासाठी किमान १५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अशा वातावरणात निवडणूक घेणे जोखमीचे असून, सर्वप्रकारची सुरक्षितता पाळून निवडणूक यंत्रणा सक्रिय करावी लागत आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायझरची खरेदी करावी लागणार आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा तीनपट केंद्रांची संख्या ठेवावी लागणार आहे. तेवढे कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. टेबलसह अनुषंगिक खर्चही वाढणार आहे. त्यामुळे किमान ३५ लाख रुपये त्याचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सुरक्षेसह इतर ५० लाखांपर्यंत येण्याची शक्यता आहे.
मागील निवडणूक अकरा लाखांत झाली होती, त्यातील सुमारे अडीच लाख रुपये हे पोलीस बंदोबस्तासाठी खर्च झाले होते. यावेळेला मात्र पाचपट खर्च वाढणार असल्याने तो बोजा ‘गोकुळ’वर पर्यायाने दूध उत्पादकांवर पडणार आहे.
निवडणूक प्राधिकरण आक्षेप घेण्याची शक्यता
सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करताना निवडणुकीसह खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना निवडणूक प्राधिकरण देते. त्यानुसार त्यांनी निवडणूक खर्चाची मर्यादाही ठरवून दिलेली असते. त्यामुळे ‘गोकुळ’च्या ५० लाखांच्या खर्चावर सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण आक्षेप घेण्याची शक्यता आहे.