दत्ता लोकरे - सरवडे ‘गोकुळ’ची राजकीय लढाई सुरू झाल्याने राधानगरी तालुक्यात इच्छुकांनी आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत. सत्तारूढ गटाकडून विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने दुसरी उमेदवारी मिळविण्यासाठी दूधगंगा काठावरून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गतवेळी हुकलेली संधी मिळविण्यासाठी दूधगंगा काठावरील नेते व कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांकडे मागणी केली आहे.राधानगरी तालुक्यात मतदानास ४३१ संस्था पात्र आहेत. त्यापैकी ठराव गोळा करताना विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी सुमारे २५० ठराव गोळा केले, तर विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे यांच्यासह अन्य नेतेमंडळींनीही जोरदार ठराव गोळा करण्याची मोहीम केली. गत पंचवार्षिकमध्ये डोंगळे व धुंदरे यांना भोगावती काठावरच उमेदवारी दिल्याने दूधगंगा काठावरील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.दरम्यान, दूधगंगा काठावर उमेदवारी पक्ष बळकटीबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये त्या सत्तेचा वापर करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे दूधगंगा काठावर उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मागणी होत आहे.दूधगंगा काठावर बिद्री साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह मोरे, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, सुभाष चौगले (पंडेवाडी), जगदीश लिंग्रस (राधानगरी), प्रभाकर पाटील (चंद्रे), उमर पाटील (तुरंबे), शरद पाटील (मालवे), संभाजी ताशिलदार (तुरंबे), ए. डी. पाटील (आकनूर), संजय कांबळे (सोळांकूर), यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए. वाय. पाटील यांनी सत्तारूढ गटातून, तसेच बाळूमामा देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी मागणी केली आहे, तर भोगावती काठावरून विद्यमान संचालक अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, उदयसिंह पाटील (कौलवकर), सदाशिव चरापले, आदी इच्छुक आहेत. यापूर्वी दूधगंगा काठावरून मधुकर पाटील (कसबा वाळवे), सुषमा पाटील (लिंगाचीवाडी), फिरोजखान पाटील (तुरंबे) यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ची हंडी जिंकण्यासाठी काठावर की नेत्यांच्या निष्ठेवर उमेदवारी मिळणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
‘गोकुळ’साठी राधानगरीत इच्छुकांची मोर्चेबांधणी
By admin | Published: March 19, 2015 8:55 PM