विश्वास पाटील ।कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले आणि शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक अनिल यादव यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) संचालकपद मिळण्यात अडचणीच जास्त आहेत. या पदास खुद्द ‘गोकुळ’मधूनच विरोध होण्याची शक्यता जास्त आहे. गेल्याच आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांनी या दोघांना गोकुळ दूध संघात संचालक म्हणून संधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
या दोन नेत्यांना भाजपने पक्षात प्रवेश करताना जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण झालेली नाहीत. तोंडावर आॅगस्टमध्ये शिरोळ नगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे यादव नाराज होणे पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे त्यांची वर्णी गोकुळ दूध संघात लावण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. तीच स्थिती इंगवले यांच्याबाबतही आहे. त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हवे आहे आणि भाजपचे नेतृत्व त्यांना आता ते देणे शक्य नसल्याचे सांगून गोकुळचा ग्लास दाखवू लागले आहेत; परंतु त्यांनाही ते मान्य नाही. आणि दुुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून त्यांनी ते पद स्वीकारायचे ठरविले तरी ते मिळण्यात अडचणी जास्त असल्याचे सहकार विभागातील जाणकार व गोकुळच्या सुत्रांशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले.
गोकुळ दूध संघावर सध्या भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबा देसाई व रामराजे कुपेकर हे स्वीकृत तज्ज्ञ संचालक म्हणून आहेत. दिवंगत संचालक सुरेश पाटील यांचा मुलगा सत्यजित यालाही स्वीकृत करून घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी शासनाने ज्या सहकारी संस्थेला शासनाने भाग भांडवल दिले आहे, त्यावर शासन प्रतिनिधी म्हणून तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. शासन प्रतिनिधी नियुक्त करणार असाल, तर मग तुम्ही भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची वर्णी संघावर कशी लावता येणार,अशी विचारणा आता ‘गोकुळ’च्या वर्तुळातूनच होऊ लागली आहे. संघात माजी आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांचाच शब्द प्रमाण मानला जातो.
महाडिक हे ‘दादाप्रेमी’ असले तरी ते पी. एन. यांच्या शब्दाबाहेर नाहीत व पी. एन. हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत व गोकुळ दूध संघाची ओळख ही काँग्रेसच्या ताब्यातील संस्था अशी आहे. त्यामुळे या सगळ््या गोष्टी विचारात घेता इंगवले-यादव यांच्या नियुक्तीस विरोध होण्याची शक्यता जास्त आहे. ( पान ४ वर)जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हेच ‘टार्गेट’राष्ट्रवादी काँग्रेसमधून जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याचा नेत्यांनी ‘शब्द’ दिला होता. त्यामुळे अन्य कोणत्याही पदापेक्षा हे अध्यक्षपद मिळावे यासाठी कायमच आग्रह राहील अशी ठाम भूमिका अरुण इंगवले यांनी घेतली असल्याचे समजते. मागच्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी आमदार हाळवणकर यांनी इंगवले यांना फोन केला होता. त्यांनी इंगवले यांना कोणत्या तरी महामंडळावर किंवा गोकुळ दूध संघावर संधी देण्यासंदर्भात विचारणा केली. परंतुु तेव्हाही इंगवले यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचीच संधी द्यावी, अशी विनंती केल्याचे समजते. त्यावेळी त्यांनी जिल्हापरिषदेत काठावरील बहुमत आहे व आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याकडून पुन्हा मोर्चेबांधणी होऊ शकते, म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शौमिका महाडिक यांनी देणे धोक्याचे असल्याने त्याऐवजी गोकुळ दूध संघात स्वीकृत संचालकपदी संधी दिली जाईल, असे इंगवले यांना सूचविले. परंतु त्यानंतर इंगवले यांना गोकुळबाबत कोणीही थेट विचारणा केलेली नाही.