वारणानगर : गोकुळप्रमाणेच वारणेच्या दूध उत्पादकांना बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी जनसुराज्यशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह जाधव यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या वेळी विजयसिंह जाधव दिलेल्या निवेदनात कोल्हापूर जिल्हा सह. मध्यवर्ती बँकेच्यावतीने गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे. याबद्दल जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने बँकेचे आभार मानले असून, कोल्हापूर जिल्ह्यातच श्री वारणा सह. दूध उत्पादक संघ आहे. या दूध संघाचेही कोल्हापूर जिल्हा हेच कार्यक्षेत्र आहे. आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणारे बिनव्याजी कर्ज हे देखील वारणा दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दिले जावे, अशी मागणी विजयसिंह जाधव यानी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.