कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक व धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सरकार मल्टिस्टेटला परवानगी देणार नाही, असा शब्द जिल्ह्यातील जनतेला दिला होता, तो पाळावा, असे आवाहन करत या निर्णयावर मुख्यमंत्र्यांसमोर पालकमंत्री की महाडिक मोठे हे ठरणार असून, ‘मल्टिस्टेट’ म्हणजे ‘गोकुळ’चे महाडिकीकरण असल्याची टीका कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.आमदार पाटील म्हणाले, ‘‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत आम्ही वर्षभर भूमिका मांडत आहोत. राज्य सरकारकडे हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुरेश हाळवणकर, अमल व धनंजय महाडिक हे एकत्रित अथवा वेगवेगळे मुख्यमंत्र्यांना भेटून मल्टिस्टेटसाठी आग्रह केला आहे; पण लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रात कोणाची सत्ता येणार हे माहिती नाही; पण राज्य सरकारने मल्टिस्टेटला परवानगी देणार नसल्याची ग्वाही जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांनी दिली होती. आता दोन्ही ठिकाणी सत्ता त्यांचीच असून, त्यांनी शब्दाला जागावे. यावरून सरकारमध्ये महाडिकांचे की पालकमंत्र्यांचे ऐकले जाते, हे सिद्ध होणार आहे.’संचालकांनी मतदारांचा घात करू नयेमहाडिक हे ‘गोकुळ’मधील ठेकेदार आहेत, त्यांचा दबाव न घेता उद्या टॅँकर बंद करतो, असे संचालकांनी ठणकावून सांगितले पाहिजे. ज्यांनी तुम्हाला निवडून दिले, त्या मतदारांचा घात करू नका, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून मतदानाचा हक्क हिरावून घेऊ नका, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.एका माणसासाठी उत्पादकांच्या आकांक्षावर पाणी नकोप्रत्येक संचालकांची २00-३00 मते आहेत, तुमचे मताचे वजन असल्यामुळेच पॅनेलमध्ये घेतले जाते. मल्टिस्टेट झाल्यानंतर एक हजार सभासद बाहेरचे केले, तर तुमचे वजन राहणार का? संघावर सत्ता कोणाची, यापेक्षा ‘गोकुळ’ कोल्हापुरातील कष्टकरी उत्पादकांच्या ताब्यात राहिला पाहिजे. एका ठेकेदाराच्या अट्टाहासापायी लाखो उत्पादकांच्या आकांक्षावर पाणी फिरू देऊ नका, असेही पाटील यांनी सांगितले.
पार्टी मिटिंगमध्ये सद्बुद्धी देवो‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाची उद्या, गुरुवारी पार्टी मिटिंग असल्याचे समजते. मल्टिस्टेटवर यामध्ये चर्चा होणार आहे. लाखो दूध उत्पादकांच्या भल्यासाठी मल्टिस्टेट रद्दचा निर्णय घेण्याची सद्बुद्धी देवो. केवळ विधानसभेपुरता नव्हे, तर कायमस्वरूपी रद्दचा निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी सांगितले.समाजकल्याण निधी वाटपाचा निषेधपालकमंत्र्यांनी समाजकल्याणचा निधी भाजप तालुकाध्यक्षांमार्फत वाटप करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असून, त्याचा निषेध करतो. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. हक्क काढून घेणार असाल, तर सभापतींचे अधिकार काढून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना द्या. याबाबत उद्या, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची दोन्ही कॉँग्रेसच्या सदस्यांसह आपण व हसन मुश्रीफ भेट घेणार आहे. निर्णय मागे न घेतल्यास न्यायालयात जिल्हा परिषदेबरोबरच व्यक्तिगत मित्तल यांना वादी केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.