लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये सत्ताधारी नेत्यांचा निरोप आला की कोणत्याही विषयाला मंजुरी द्यायची, ही पद्धत आहे. यालाच आपला विरोध होता. संघाचा हिताचा जरी मुद्दा असला तरी तो कोणी मांडला यालाच महत्त्व दिल्याने गेल्या पाच वर्षात अनेक निर्णय चुकीचे झाले, असा आरोप ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
‘गोकूळ’चा डोलारा म्हैशीच्या दुधावर आहे, केवळ गायीवर संघ चालला नसता. अलीकडील काळात दूध वाढले, याला कारण संकलन विभाग आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले. मात्र मार्केटिंगमध्ये खूप मागे राहिलो आहे. भविष्याची वाटचाल म्हणून नेतृत्वाने काहीच करू दिले नाही. आपल्या अध्यक्ष पदाच्या तीन वर्षाच्या कालावधीत संघाच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे, एक लाख लीटर दूध संकलन वाढविले. आनंदराव पाटील-चुयेकर यांचा विचार घेऊन काम केले. मात्र अलीकडे नेत्यांचा निरोप आला की त्यावर चर्चा न करताच मंजुरी देण्याची प्रथा सुरू झाली, त्याला संचालक मंडळातील ८० टक्के लोक हाेय म्हणायचे. आम्ही संघाचे हिताचे विषय मांडले की त्याला दुर्लक्षित करायचे, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.
बारा लाख संकलन, भरती मात्र २० लाखांची
देशातील अनेक नामवंत दूध संघ कमी कर्मचाऱ्यांवर अतिशय उत्तम सुरू आहेत. पाचशे कर्मचाऱ्यांवर ४० लाख दूध संकलन करणारे संघही आहेत. ‘गोकूळ’मध्ये मात्र १२ लाख दूध संकलन असताना २० लाख लीटर दूध संकलनाएवढी नोकरभरती केल्याचा आरोप डोंगळे यांनी केला.