कोल्हापूर : जिल्हाभर झालेल्या अतिवृष्टीने सर्वच नद्यांना पूर येऊन जिल्ह्यातील वाहतुकीचे प्रमुख ३३ हून अधिक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. १०७ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा फटका गोकुळ दूध संकलनालाही बसला आहे. गुरुवारी सकाळी आठ प्रमुख संकलन केंद्रावर तब्बल १९ हजार ३४ लिटरचे संकलन होऊ शकले नाही. संध्याकाळी परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याने संकलन ठप्प झाल्याची आकडेवारी ३० हजार लिटरवर पोहोचली.
गोकुळचे रोजचे दूध संकलन ११ लाख ४६ हजार इतके आहे. बुधवारी पावसाचा फारसा जोर नसतानाही संकलन ३० हजारांनी घटले. गुरुवारी तर पावसाने कहरच केल्याने बंद पडणाऱ्या मार्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आज शुक्रवारी संकलनात आणखी घट होणार आहे. पर्यायी मार्गे वाहतूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण बऱ्यापैकी प्रमुख मार्ग बंदच झाल्याने पर्यायी वाहतूकही जवळपास ठप्प झाल्यातच जमा आहे. संकलनच होऊ शकले नसल्याने गोकुळ दूध संघासह उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे.
संकलन कमी झाले असताना विक्रीवरही परिणाम झाला आहे. शहरात बऱ्याच भागात पाणी शिरल्याने स्थलांतर सुरू झाले आहे. त्यामुळे रोजच्या दूध विक्रीवर आजपासून परिणाम होणार आहे. कोकण व गोव्यात ही मुसळधार पाऊस पडत आहे. शिवाय तिकडे जाणारे आंबोली, करूळ, फोंडा, आंबा घाट वाहतुकीसाठी बंद झाल्याने कोकण व गोव्याशी संपर्क तुटला आहे. आजऱ्यातील व्हिक्टोरिया पाण्याखाली गेल्याने गोव्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
या सर्वांचा परिणाम गोकुळच्या दूध विक्रीवर झाला आहे. सिंधुदुर्गला ५ हजार तर गोव्याला ४ हजार लिटर दूध कोल्हापुरातून जाते. हा पुरवठाच थांबल्याने गोकुळचे प्रतिदिन ९ हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. याचवेळी असाच पावसाचा जोर राहिल्यास कोल्हापूर शहरासह मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या दूध पुरवठ्यातही विस्कळीतपणा येणार आहे.