कोल्हापूर : गोकुळ दूध संघासाठी सोमवारी झालेल्या छाननीत भारती विजयसिंह डोंगळे, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, पी. जी. शिंदे, यशवंत नांदेकर आदी प्रमुखांचे अर्ज अवैध ठरले. संघाच्या पोटनियमानुसार दूध पुरवठ्यासह पशुखाद्याच्या अटींची पूर्तता न केल्याचा फटका दिग्गजांना बसला. छाननीत ४१ जणांचे अर्ज थेट अवैध ठरले तर ३५ जणांची सुनावणी घेऊन निर्णय होणार आहे, त्यामुळे ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरण्याची शक्यता आहे.गोकुळच्या २१ जागांसाठी ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील व डॉ. गजेंद्र देशमुख यांनी छाननी प्रक्रिया सुरू केली. सुरुवातील सर्वसाधारण गटातील वैध अर्ज निश्चित करण्यात आले. त्यावर हरकत नोंदवण्याचे आवाहन केल्यानंतर अवैध अर्ज बाजूला काढले.
अवैध अर्जांबाबतही म्हणणे ऐकून घेतले. छाननीत ७६ जणांचे १०४ अर्ज अवैध ठरले, त्यापैकी ३५ जणांनी हरकत घेतली, त्यावर सुनावणी झाली असून आज, मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी निकाल देणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी दीडपर्यंत छाननी होऊन त्यानंतर सुनावणी घेण्यात आली.