कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ने गाय व म्हैस दूध खरेदी दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन, तर म्हशीच्या दुधाला एक रुपया ७० पैशांची वाढ केली आहे. दूध उत्पादकांना १ फेबु्रवारीपासून ही दरवाढ मिळणार आहे.राज्यात दुधाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच खासगी व सहकारी दूध संघांनी गाय व म्हैस दूध खरेदी दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र ‘गोकुळ’सह कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांनी निर्णय घेतला नव्हता. मागील पाच-सहा वर्षाची ‘गोकुळ’चे दूध संकलन पाहता, यंदा संकलनात मोठी घट झाली असून त्याचा परिणाम वितरणावर दिसत आहे.साधारणत: आपल्याकडे आॅक्टोबरपासून दुधाचा पुष्टकाळ सुरू होतो, या काळात दुधाची आवक वाढते. मात्र यंदा महापूर आणि चाराटंचाईमुळे दूध वाढलेच नाही. डिसेंबर व जानेवारी महिन्यात प्रतिदिनी दोन लाख लिटरने दूध कमी झाले. उन्हाळा तोंडावर असल्याने दुधाची मागणी वाढणार आहे. त्यात अपेक्षित दूधसंकलन नसल्याने ‘गोकुळ’चे प्रशासन अडचणीत आले आहे. त्यामुळेच दरवाढ करणार नाही, असे म्हणणाऱ्या ‘गोकुळ’च्या प्रशासनाने अखेर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन, तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर एक रुपया ७० पैसे दरवाढ केली आहे. या दरवाढीची अंमलबजावणी १ फेबु्रवारीपासून केली जाणार आहे.