कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) ‘मल्टिस्टेट’चा ठराव अखेर रद्द करीत असल्याची घोषणा अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत केली; पण मागील प्रोसीडिंगमधून हा विषय रद्द करून मगच त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केल्याने सभेत गोंधळ उडाला. गेली दोन वर्षे जिल्ह्याचे राजकारण ‘मल्टिस्टेट’भोवतीच फिरत राहिल्याने हा विषय अतिशय संवेदनशील झाला होता.‘गोकुळ’ची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात झाली. प्रास्ताविकात अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी संघाच्या कारभाराचा आढावा घेत मुंबईतील ‘गोकुळ’ दुधाची मागणी वाढली असून, पॅकिंग सेंटर कमी पडत आहे. त्यासाठी वाशी येथे लवकरच नवीन सेंटर सुरू करीत असल्याचे सांगितले.
‘मल्टिस्टेट’बाबत दूध उत्पादकांमध्ये काही गैरसमज आहेत. त्यामुळे शेवटच्या दूध संस्था प्रतिनिधींच्या मनातील गैरसमज दूर होत नाही, तोपर्यंत मल्टिस्टेटचा ठराव रद्द करीत असल्याची घोषणा अध्यक्ष आपटे यांनी केली; पण मागील प्रोसीडिंगमधील ‘मल्टिस्टेट’चा विषय रद्द करूनच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार तसे करता येत नाही. त्यात मल्टिस्टेटबाबत काही संस्था सहकार न्यायालयात गेल्याने हा न्यायप्रविष्ट विषय बनल्याने प्रोसीडिंगमधून तो काढून टाकता येणार नाही, असे अध्यक्ष आपटे यांनी स्पष्ट केल्याने एकच गोंधळ उडाला.
सत्तारूढ व विरोधक एकमेकांसमोर आल्याने सभेत तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना सभागृहाबाहेर काढल्यानंतर तणाव निवळला. अवघ्या ३५ मिनिटांत सभेचे संपूर्ण कामकाज गुंडाळण्यात आल्याने संस्था प्रतिनिधींमधून संताप व्यक्त होत होता. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. रणजीजितसिंह पाटील यांनी आभार मानले.