कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत उद्या (मंगळवारी) सुनावणी होत आहे. ‘गोकुळ’ने राज्य शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच आव्हान दिल्याने याकडे साऱ्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने अशा वातावरणात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नसल्याने निवडणूक ३१ मार्च २०२१पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, यामध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्था वगळण्यात आल्याने ‘गोकुळ’ची प्रक्रिया सुरू राहील. ‘गोकुळ’ला आता निवडणुका नको असल्याने शुक्रवारी (दि. ५) राज्य शासनाच्या स्थगितीलाच संघाने आव्हान दिले. त्यावर आज (सोमवारी) सुनावणी होईल, असा अंदाज होता. मात्र, आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. संघाने राज्य शासनाला प्रतिवादी केल्याने ते काय भूमिका न्यायालयात मांडतात, यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीचा वाद न्यायालयात असला, तरी सत्तारूढ व विरोधकांनी प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. ठरावधारकांच्या गाठीभेटी घेण्यास दोन्ही गटांकडून सुरूवात झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत न्यायालयात काय निकाल लागतो, याकडे सगळ्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.